जळगाव : प्रतिनिधी
सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले लालचंद चौधरी यांच्या हातून हा प्रकार घडला आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे बँकेत दैनंदिन व्यवहार सुरू होते. अनेक ग्राहक आर्थिक व्यवहारासाठी बँकेत आलेले होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांच्या ताब्यातील डबल बोअरची बंदूक अचानक लॉक झाली. बंदुकीचा लॉक काढत असताना अचानक बंदुकीतून गोळी फायर झाली. ही गोळी प्रमिला वसंत लोहार (रा. तळवेल, ता. भुसावळ), शोभा प्रकाश माळी, कलाबाई चौधरी, तसेच राधेश्याम छबीलदास जैस्वाल (तिघे रा. वरणगाव) यांना लागल्याने ते जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बँकेत एकच खळबळ माजली. फायरिंगचा आवाज ऐकून पळापळ देखील झाली. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी बँकेत धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे बँकेचे आर्थिक व्यवहार थांबविण्यात आले होते. घटनेची माहिती शहरभर पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी बँकेच्या आवारात एकच गर्दी केली होती. पोलीस अधिक तपास करीत आहेत.