माणगाव : प्रतिनिधी
कोरोना साथीमुळे लॉकडाऊन काळात शाळांना सुटी आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21चे नवीन वर्ष लॉकडाऊन नसते तर 15 जून सोमवारी सुरू झाले असते. मात्र लॉकडाऊनमुळे नवीन शैक्षणिक सत्र जूलै महिन्यापासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात फक्त इयता नववी ते दहावी व बारावीचे वर्ग भरणार असून ऑगस्ट महिन्यात सहावी ते आठवीचे वर्ग भरतील व सप्टेंबर नंतर उर्वरित वर्गाचे शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याचे संकेत शासनामार्फत मिळाले आहेत.
मात्र नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असणार्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत मिळणार्या पुस्तकांचे वितरण तालुकास्तरावर सुरू झाले आहे. तालुक्यातील शाळांमध्ये 15 जूनपासूनच पुस्तके वितरणाची प्रक्रीया सुरू झाली. असून संबंधित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व केंद्रप्रमुख संबंधित पुस्तके आपापल्या शाळांमध्ये ठेवत आहेत. तालुक्यातील 69013 मोफत पुस्तकाचे वितरण करण्यात येत आहे.
शाळा सुरू होणार्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्याच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग काम करीत आहे. हे वितरण केले जात असून नवीन वर्षाच्या प्रारंभ दिनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणारी पुस्तके निश्चित मिळणार असल्याने पालक व शिक्षणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.