पनवेल : वार्ताहर
टी पॉईंट उरणकडे जाणार्या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून पळून जाणार्या आरोपीच्या चित्तथरारक पाठलागानंतर पनवेल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पहाटे 3 वाजताच्या सुमारास टीपॉईंट उरणकडे जाणार्या रोडच्या सर्व्हिस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवी मुंबई यांनी रात्रपाळी ठाणे अंमलदार महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांना संदेश दिला होता. या संदेशाप्रमाणे मुसळे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडित महिला हिच्याकडे चौकशी केली. या वेळी तिने सांगितले की, ती तिचे पुणे येथे राहत असलेल्या पतीला भेटण्यासाठी उत्तरप्रदेश येथून आली असून ट्रेलरला हात करून ट्रेलरमध्ये बसून पुणे येथे चालली होती. परंतु ट्रेलर चालकाने पुणे येथे घेऊन न जाता बलात्कार केला व ट्रेलरचालक पळून गेला आहे. मुसळे यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना माहिती दिली. या प्रकाराबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे व स्टाफ यांना या प्रकाराबाबत माहिती देऊन घटनास्थळी जाऊन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे तारमळे व स्टाफ यांनी खाजगी इनोव्हा वाहनाने उरण दिशेकडे ट्रेलर व आरोपीचा शोध सुरु केला. या वेळी जेडब्ल्यूआर वेयर हाऊस जवळ रोडच्या एका बाजूस ट्रेलर नंबर एमएच 43 बीपी 1770 हा उभा होता. या ट्रेलरचा नंबर व पीडित महिलेने दिलेला नंबर मिळता जुळता असल्याने तेथे जाऊन ट्रेलर चालकास आवाज दिला. या वेळी चालक ट्रेलर घेऊन पळू लागला. त्याचा पाठलाग सुरु केला. पाठलाग चालू असल्याबाबत वेळोवेळी नियंत्रण कक्ष नवी मुंबई यांना तसेच मुसळे यांना तारमळे हे माहिती देत होते. तसेच टी पॉईंट, कळंबोली सर्कल, पळस्पे चेकपोस्ट येथे एखादा ट्रेलर आडवा लावण्यासाठी कळवित होते. बराच वेळ पाठलाग करुन पळस्पे चेकपोस्ट येथे एक ट्रेलर आडवा लावून रोड बंद करण्यात आला. आरोपी ट्रेलर थांबऊन त्यामधून मधून उडी मारून तो पळून जात असताना त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव बिकास जरनील सिंग, वय 35 वर्ष, धंदा चालक, रा. कलमपूर, ता. संगरूर, पंजाब असे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पनवेल शहर पोस्टे गुन्हा रजिस्टर नंबर 226/2020 , भा. दं. वि. कलम 376, 323 मध्ये अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे.