Friday , September 29 2023
Breaking News

कीर्तनकार समाजाला दिशा देतात : आमदार प्रशांत ठाकूर

कर्जतमध्ये प्रबोधनकारांचा कार्यगौरव सोहळा

कर्जत : प्रतिनिधी
कीर्तनकार मंडळी समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हाला मिळेल यात शंका नाही. आपण सर्व मिळून चांगले काम करू.’ असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते कर्जत येथे मंगळवारी (दि. 20) आयोजित प्रबोधनकारांच्या कार्यगौरव सोहळ्यात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस तसेच सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रबोधनकारांच्या कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन किरण ठाकरे यांनी केले होते. ह. भ. प. मारुती महाराज राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.
कर्जतजवळील किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्यास आमदार किसन कथोरे, आमदार महेंद्र थोरवे, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, संतोष भोईर, आत्माराम विशे, आरपीआय तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, आध्यत्मिक विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष काशिनाथ पारठे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, रमेश मुंढे, दीपक बेहेरे, नरेश मसणे, विकास बडेकर, प्रवीण सकपाळ, जाधव, प्रदीप घावरे, साईनाथ श्रीखंडे, राहुल वैद्य, सरपंच संतोष सांबरी, प्रमिला बोराडे, राजेंद्र येरूणकर, विनायक उपाध्ये, हृषिकेश जोशी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवा भारत घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून आजचा हा सोहळा आनंदाचा असल्याचे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
आमदार किसन कथोरे म्हणाले की, या राज्यात खरे परिवर्तन झाले ते हिंदुत्वाच्या नावाने. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या नावाने पुढे आले. बाळासाहेबांची शिवसेनासुद्धा हिंदुत्वाच्या नावाने पुढे होती, पण मध्यंतरी त्यांनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा नारा पुकारला आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना आली. त्यांनी पुढे बोलताना वारकरी सांप्रदायाचा सहवास लोकप्रतिनिधिंना उपयुक्त आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कामासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, असे सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मनोगतात, समाजाची सेवा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाचे, धर्मकार्याचे काम सुरू आहे. कोंकण दिंडीसुद्धा या भूमीतून निघते हे अभिमानस्पद आहे. उल्हास नदीच्या काठावर प्रतिआळंदी उभी रहात आहे. त्यामध्ये चाळीस फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती आहे. हे आपल्या कर्जतचे वैभव ठरेल. वारकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्ही प्रस्ताव सादर करा, ते मंजूर करण्याचे काम आम्ही करू, असा शब्द दिला.
भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. आयोजक किरण ठाकरे यांनी प्रास्ताविकात खर्‍या अर्थाने वारकरी सांप्रदाय घरोघरी रूजविण्याचे काम ह. भ. प. राणे महाराजांनी केले. ही संपत्ती आपण जपली पाहिजे. तालुक्यात वारकरी भवन असावे. वारकरी बांधवांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
या सोहळ्यात कर्जत-खालापूर तालुक्यातील कीर्तन, प्रवचन, भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणार्‍या वारकर्‍यांचा व पत्रकारांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण फराट यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दीपक बेहरे यांनी मानले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply