पाली ः प्रतिनिधी
कोरोना आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद सेवा मंडळ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पंचशील नगर, झेंडेवाडी येथील 250 चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
चक्रीवादळामुळे अनेक जणांचे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक सामान व अन्नधान्यदेखील वाया गेले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळेही अनेकांना जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासत आहे. अशा वेळी कुणीही केलेली वस्तूरूपी मदत लाखमोलाची ठरत आहे. या अडीअडचणीच्या व टंचाईच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू तसेच आदिवासी लोकांना करण्यात आलेली मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे. साहित्य वाटप करतेवेळी ट्रेक क्षितिजचे अध्यक्ष राहुल मेश्राम, सदस्य श्रेयस, महेंद्र, पल्लवी, नयना, विवेकानंद सेवा मंडळाचे केतन बोन्द्रे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे उमेश झिरपे, पाच्छापूर शाळेतील प्राचार्य दीपक माळी, नारायण वारा, राजिप पाच्छापूर शाळेचे शिक्षक अनिल राणे, गावचे पोलीस पाटील मोरेश्वर वारघुडे तसेच ग्रामस्थ विश्वास तांबट, बच्चू भुस्कुटे आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. सुधागड तालुक्यातील वादळग्रस्तांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या संस्थांनी खारीचा वाटा उचलल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.