नागोठणे ः प्रतिनिधी
शहरासह विभागाची कोरोना रुग्णांची दोन महिने पाटी कोरी असतानाच काही दिवसांपासून कोरोनाने येथे शिरकाव करीत रोज आपली संख्या वाढतीच ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात चार दिवसांपूर्वी ब्राम्हण आळीतील एका सरकारी कर्मचार्याला कोरोनाची लागण लागल्यावर संबंधित व्यक्तीच्या 55 वर्षीय आईलाही कोरोनाने गाठले आहे. येथील सूर्यदर्शन कॉलनीच्या परिसरात चार दिवसांपूर्वी एका सरकारी कर्मचार्याचासुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीची तसेच तीन वर्षीय मुलाची तपासणी केली असता पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच या व्यक्तीच्या बरोबर असणार्या दोन व्यक्तींची तपासणी केली असता यापैकी एका व्यक्तीचा पॉझिटिव्ह, तर दुसर्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
शहरात आतापर्यंत नऊ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील चार रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. हे सरकारी कर्मचारी एकाच शासकीय यंत्रणेत कार्यरत आहेत.
विभागातसुद्धा विविध गावांत असलेले बहुतांश रुग्ण रिलायन्स कंपनीशी संबंधित आहेत. याबाबत रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांना विचारले असता त्यांनी आज नव्याने सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट करताना हे सातही जण कंपनीत काम करीत असलेल्या ठेकेदाराचे कामगार असल्याचे सांगितले, मात्र रिलायन्सच त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या निवासी संकुल जलतरण तलावाशेजारी असणार्या एका सभागृहात कंपनीचे चार कर्मचारी व एक अधिकारी कोरोनावर उपचार घेत असल्याचे सत्य आहे का, असे विचारले असता धनावडे यांनी या वृत्ताचे खंडन करताना कंपनीतील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाचे नाव आम्ही लपवून न ठेवता जाहीर करतो, असे निक्षून सांगितले.