अनेक जण मास्कविना
कर्जत : प्रतिनिधी – कर्जत शहरात नगर परिषदेने मास्क न लावणार्यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि लोक मास्क लावू लागले, मात्र अद्यापही अनेकांना याचे गांभीर्य समजत नाही की, आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात तसेच बाजारपेठेत फिरणार्या काही भिकार्यांच्या तोंडाला मास्क किंवा फडके नसते. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा लढा देण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते शंभर टक्के यशस्वी होतील की नाही, हे सांगता येत नाही.
जगभर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आदी सूचना लोकांना करायला लागतात हे खरे दुर्दैव आहे. आता कुणी अडाणी राहिले नाही, मात्र मला काय होणार नाही या अविर्भावात सारेच जण वावरतात. असा फाजील आत्मविश्वास दाखवणार्या अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काहींना हे जग सोडून जाण्याची वेळ आली.
मास्क लावण्यासाठी दंड का आकारावा लागतो म्हणजे जनतेला स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे गांभीर्य नाही. सगळी काळजी प्रशासनालाच. या अशा निष्काळजीपणामुळे जाणार्याचा जीव जातो, परंतु त्याच्यावर अवलंबून असणार्यांचे काय हाल होतात, ते बघायला तो नसतो. संसार उघडा पडतो, बायका-पोर रस्त्यावर येतात. भविष्यात किती तरी प्रश्न उभे राहतात.
कर्जत तालुक्यापुरत बोलायच झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले 90-92 टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना फिकीर नसल्याने ते मास्क लावत नाहीत. व्यापारी मंडळींचेसुद्धा असेच आहे. नगर परिषदेचे कर्मचारी दिसले की मास्क किंवा रुमाल बांधण्याची एकच घाई होते. भविष्यात मास्क हे आपल्या जीवनशैलीतील एक भाग बनणार आहे. एरव्ही आपण चैनीसाठी मागे-पुढे न पाहता कितीही पैसे खर्च करीत असतो, परंतु चांगला मास्क घेण्यासाठी कंजूषी करतो. आपल्या मुला-नातवांना किंवा बायकोसाठी शंभर-दीडशे रुपयांचा खाऊ घेतो, पण चांगला मास्क विकत आणण्याचे टाळतो.
मास्क लावण्याच्या बंधनाने अनेकांना तंबाखू किंवा गुटका खाऊन सारखे-सारखे थुंकता येत नाही. काहींना स्पष्ट उच्चार करता येत नाहीत. काहींची नाके दबली जातात, तर मास्कच्या रबरी नाडीने काहींचे कान दुखतात. खरे म्हणजे मास्क लावलेला आपला कितीही जवळचा नातेवाईक किंवा मित्र असल्यास पटकन ओळखू न आल्याने पंचाईत होते.
कोरोनाशी जुळवून घेण्याची वेळ येणार असल्याने मास्क वापरणे अनिवार्य होणार आहे. त्यामुळे लहान मुलांच्या मास्क वर त्यांच्या आवडत्या चित्रांनी जागा घेतली, तर आश्चर्य नाही तसेच काही दिवसांनी निवडणुका आल्यावर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मास्कवर आपले निवडणूक चिन्ह छापले नाही, तर नवल.