Breaking News

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णांचे हाल

पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. दरम्यान त्यामध्ये काहींना अगोदरच इतर आजार असल्याने त्यांना अधिक त्रास होतो. तसेच वयोवृद्ध रुग्णांची सुद्धा संख्या मोठी आहे. त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असते. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक हताश झाले आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा तीन हजारांच्याही वर पोहोचला आहे. दररोज त्यामध्ये भर पडत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालय व कामोठे एमजीएम या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची कमतरता असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्याचबरोबर संबंधित रुग्णांना सुद्धा आवश्यक तेवढे उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत आहेत. विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह याशिवाय वयोवृद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची आवश्यकता आहे. परंतु या सुविधांची कमतरता असल्याने गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करताना अडचणी येत आहेत.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात पनवेल येथे येऊन रुग्णांवरील उपचाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी बेड उपलब्ध होत नसल्याचे त्याचबरोबर व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केले होते.

पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटलची रुग्ण क्षमता जवळपास संपत आलेले आहे. इंडियाबुल्स याठिकाणी ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय नसलेले तेथे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना ठेवता येत नाही. अशाप्रकारे पनवेल परिसरात राज्य शासनाकडून कोविड रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होेत आहे.

हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल!

मनपाने पाच खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मान्यता दिली आहे. हे हॉस्पिटल दोन दिवसांतच रुग्णांनी भरून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी संपर्क साधला असता, आमच्याकडे कोणता बेड शिल्लक नाही, असे संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात येते. एकंदरीतच पनवेल परिसरात वाढत्या रुग्णांमुळे बेडचा तुटवडा भासत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply