कर्जत ः बातमीदार
कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. स्वच्छता व सामाजिक अंतर राखून या विषाणूला रोखता येऊ शकते, मात्र कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत याउलट चित्र दिसत आहे. अनेक दिवसांपासून डिकसळ शांतीनगर येथे कचर्याचा ढीग पडला आहे परंतु घंटागाडी गायब आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत-कल्याण राज्यमार्गावर असलेली गावे मिळून उमरोली ग्रुप ग्रामपंचायत बनली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ शांतीनगर भागात असलेल्या कचराकुंडीत कचरा जमा होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत, मात्र गावातील कचरा उचलणारी घंटागाडी गायब झाली आहे. अनेक दिवस गावात घंटागाडी फिरली नसल्याने येथील कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येऊन ती परिसरात पसरली आहे. या भागातून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच या अगोदरदेखील ग्रामपंचायत हद्दीत घंटागाडी वेळेवर येत नसल्याची तक्रार नागरिक वारंवार ग्रामपंचायतीत करीत आहेत, मात्र ग्रामपंचायत याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. लवकरात लवकर ग्रामपंचायतीने येथील कचरा उचलून गावात स्वच्छता राखावी, अशी मागणी जोर धरत आहे.
घंटागाडीवरील चालक दोन दिवस आला नाही. त्यामुळे गावातील कचरा उचलण्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. लवकरच चालकाची व्यवस्था करून कचरा उचलला जाईल अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत.
-विनोद चांदोरकर, ग्रामविकास अधिकारी, उमरोली ग्रामपंचायत
उमरोली ग्रामपंचायत हद्दीत अनेकदा कचरा साचून त्यातून दुर्गंधी येऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही परिस्थिती कायम आहे. कोरोनाच्या संकटकाळात स्वच्छता राखायला हवी. ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल.
-किशोर गायकवाड, रायगडभूषण, सामाजिक कार्यकर्ते