उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. पाऊस आणि डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहत असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरजे यांनी दिली.
उरण तालुक्यातील 52 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागाला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळातील तीन-चार दिवस वगळता पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, पण चालू जुलै महिन्यात सुरुवातीला धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत चालली होती. त्यातच डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्या पावसाच्या पाण्यामुळे रविवारी रात्रीपासून धरण दुथडी भरून वाहत असल्याचे एमआयडीसीचे उपअभियंता बिरंजे यांनी सांगितले.