Breaking News

नवीन पनवेलच्या भुयारी मार्गात साचतेय पाणी

अपघाताला निमंत्रण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गाच्या कामात असलेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यामध्ये पाणी साचत असून, या साचलेल्या  पाण्यातून वाहनचालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असताना रेल्वे प्रशासनाला मात्र जाग आलेली दिसत नाही  नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी आधुनिक पध्दतीने रेल्वेमार्गावर कोणताही ब्लॉक न घेता बांधलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पोदीवरील गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 20 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार होता. त्यापूर्वी भुयारी मार्ग सुरू होणे गरजेचे असल्याने शुक्रवार 20 जानेवारीला मध्यरात्री या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते .

पहिल्या पावसातच या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पाणी साचत असून वाहनचालकांना त्रास होत असल्याचे लक्षात आले आहे. पोदीकडे येणार्‍या मार्गात पाणी साचल्याने दुचाकीचालक आपली वाहने विरुद्ध दिशेने घेऊन जात असलेले पाहायला मिळत आहेत. महावितरण कंपनीने त्यांचा टॉवर न हलवल्यामुळे रस्त्यावर माती पडू नये म्हणून संरक्षणासाठी आणि दुभाजक म्हणून बांधलेल्या भिंतीमुळे समोरून येणारी गाडी दिसत नाही. त्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने घेऊन गेल्यास अपघात होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे.  गाढी नदीच्या काठावर हा भुयारी मार्ग 10 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. यामध्ये सिमेंटचे चार ब्लॉक तयार करून बसवण्यात आले आहेत.

या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आत साठलेले पाणी तसेच राहत आहे. ब्लॉकमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी दूसरा मार्ग नसल्याने वाहनचालकांना या पाण्यातून गाडी न्यावी लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळेस या मार्गात विजेची सुविधा नाही, त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट सुरू असताना नागरिकांना होणार्‍या या त्रासाकडे लक्ष द्यायला रेल्वे प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे.

Check Also

‘रोटरी’तर्फे पनवेलमध्ये कापसे पैठणीचे प्रदर्शन व विक्री

वर्षा ठाकूर, शुभांगी घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त थेट विणकर ते ग्राहक …

Leave a Reply