खोपोली : प्रतिनिधी
जीवघेण्या अपघातामुळे अगोदरच चर्चेत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जाहिरात फलक लावण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. बुधवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील माजगाव येथील उड्डाणपुलावर जाहिरात फलक लावण्यार्या कामगारांना ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. त्यामुळे फलक लावताना जर तोल गेला तर कामगारांच्या जीवावर बेतणार होते, शिवाय द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्या वाहन चालकांच्या धोकादायक ठरले असते.
जाहिरातबाजी करण्यासाठी जाहिरातदारांना मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग हे अत्यंत मोक्याचे ठिकाण मिळालेले आहे. द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी भलेमोठे होर्डिंग लावलेले दिसतात. टोलनाका व्यतिरिक्त बोगदे, उड्डाणपूल अशा अनेक ठिकाणी जाहिरातबाजी केल्याचे दिसून येते. द्रुतगती मार्गावर खालापूर हद्दीत असलेल्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते.
या महामार्गावरील माजगाव येथील उड्डाणपुलावर बुधवारी काही कामगार जाहिरात फलक लावण्याचे काम करीत होते. ठेकेदाराने त्यांना कोणतीही सुरक्षा साधने पुरविली नव्हती. जाहिरात फलक लावण्यासाठी असलेल्या लोखंडी पट्टीवर उभे राहून हे कामगार जाहिरात फलक लावण्याचे काम करीत होते. खालून वेगाने जाणारी वाहने आणि वरच्या बाजूला काम करणारे कामगार असे दृश्य या वेळी द्रुतगती महामार्गावर पाहावयास मिळाले. फलक लावताना तोल गेला असता तर कामगारांच्या जीवावर बेतणार होेते.
तसेच द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्या वाहन चालकांच्या जीवाशीदेखील खेळण्याचा प्रकार जाहिरात फलक लावणारे ठेकेदाराकडून सुरू आहे. जाहिरात फलक लावणारे ठेकेदारांवर आयआरबी तसेच वाहतूक पोलीस यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.