आरोग्य प्रहर
अॅसिडिटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अॅसिडिटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अॅसिडिटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात, पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. यावर काही घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आहेत.
आवळा ः शरीराला थंडावा देणारे आणि अॅसिडिटीपासून बचाव करणारे गुणधर्म आवळ्यात असतात. आवळ्यात व्हिटॅमिन सी विपुल प्रमाणात असल्याने पोटदुखीवर परिणामकारक ठरते. प्रत्येक दिवशी एक चमचा आवळा पावडर घेतल्यास अॅसिडिटीपासून मुक्तता लाभेल.
केळी ः केळी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळ्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. अन्नपचनासाठी त्याचा फायदा होतो. केळ्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने पोटात अॅसिड तयार होत नाही.
थंड दूध ः दुधात कॅल्शियम असते. त्यामुळे शरीरातील पीएच बॅलन्स संतुलित राहते आणि अन्नपचनासही मदत होते. थंड दुधामुळे पोटातील जळजळीवर ताबडतोब आराम मिळतो, मात्र त्यासाठी साखर न घालता थंड दूध प्यावे.
ताक ः अॅसिडिटी आणि छातीतील जळजळीवर ताकामुळे आराम मिळतो. ताकात लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळे पोटातील अॅसिडिटी क्षमण्यास मदत होते.
बडीशेप ः बडीशेपमध्ये एंथॉल कंपाऊंड असते. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात जे पचनास मदत करतात. तसेच त्यातील अँटीफंगल गुणामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
तुळस ः तुळशीच्या पानांमुळे छातीतील जळजळ व अॅसिडिटी नियंत्रित राहते. दोन-तीन तुळशीची पाने खाल्ल्यास पोटातील अॅसिडिटी कमी होते. तुळशीच्या पानांत अँटीअल्सर गुणधर्म असतात. त्यामुळे गॅस्ट्रीक अॅसिडची निर्मिती कमी होते. पुदिन्याची पाने ः पुदिन्यात नैसर्गिक कूलिंग एजंट असतात. पोटातील अॅसिड कमी करून पचनतंत्र मजबूत करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो. त्यासाठी पुदिन्याची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्यावे.