पळस्पे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय

पनवेल : रामप्रहर वृत्त
शासनाच्या आदेशान्वये तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी ग्रामसेवक सभेत दिलेल्या सुचनांअन्वये ग्रामपंचायत पळस्पे येथे मासिक सभा मंगळवारी (दि. 28) ठराव नंबर 155/1 अन्वये कोरोनापासून आपल्या गावातील ग्रामस्थांचा बचाव व्हावा म्हणून खालील प्रमाणे निर्णय घेणेत आला आहे. यामध्ये मास्क न बांधल्यास 50 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच पुढील काही निर्णय घेण्यात आले. सर्व भाजीपाला दुकाने दर बुधवारी बंद राहतील तसेच इतर दिवशी भाजीपाला दुकाने सकाळी 6 ते 11 पर्यंतच उघडी रहातील. शासनाचे आदेशान्वये तोंडाला मास्क किंवा कपडा नसल्यास रुपये 500 रुपये दंड आहे, परंतू गावातील जनतेची आर्थिक बाब विचारात घेवून पळस्पे येथे 5 ऑगस्टपासून तोंडाला मास्क किंवा कपडा नसल्यास 50 रुपये दंड वसुली केली जाईल. दंड न दिल्यास संबंधीताची तशी नोंद पोलीस स्टेशनला करणेत येणार आहे. पळस्पे गावातील सर्व जनतेने कामाशिवाय बाहेर फिरु नये वेळोवेळी स्वच्छ साबण पाण्याने हात धूणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालणे, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, तसेच वरील बाबींचे पालन करावे, असे आवाहन सरपंच चंद्रकांत अर्जुन भोईर यांनी केले आहे.