Breaking News

जलसाक्षर भारतासाठी

जल किंवा पाणी या दोन अक्षरी शब्दापुढे सध्या प्रत्येकाच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. जेव्हा विहीर कोरडी पडते, तेव्हा पाण्याची खरी किंमत कळते, हे बेंजामिन फ्रँकलिनचे वाक्य पाण्याचे मानवी जीवनासाठी असलेले महत्त्व पटवून देते. जगात तिसरे महायुद्ध झालेच, तर ते पाण्याच्या टंचाईमुळे होईल, असे भाकीत बहुसंख्य तज्ज्ञांनी केलेले आहे. जगातील प्रत्येक देशाला  पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. माणसाला अन्नावाचून व वस्त्रावाचून काही दिवस जगता येणे शक्य आहे; मात्र पाण्यावाचून जगता येणे अशक्य आहे. पाणी हे कृषी व्यवसायाचा प्राण आहे, आत्मा आहे. एवढेच नव्हे, तर जगातील प्रत्येक सजीव हा पाणी या घटकाशी निगडित आहे. पाणी या घटकाचा समतोल दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. पाण्याचा प्रश्न आता सर्वांनाच भेडसावत आहे, दिवसेंदिवस तो अधिक बिकट होत चालला आहे.

आजच्या काळात पाणी हा घटक माणसामाणसांत, राज्याराज्यांत, राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष निर्माण करणारा घटक ठरत आहे.  पाण्याचे एवढे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अर्थात, पाण्याचे हे दुर्भिक्ष निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झाले नसून, आजवरच्या चुकीच्या नियोजन व धोरणांचा तो परिपाक आहे. प्रामुख्याने सध्याचे जलसंकट हे मानवनिर्मित आहे. पाणी साठवण, वापर आणि विनियोगाच्या पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल करणे, हाच त्यावर उत्कृष्ट उपाय ठरणार आहे. अर्थात, त्यासाठी जलसाक्षरता होणे गरजेचे आहे.

जलसाक्षरता ही व्यापक संकल्पना आहे. पाण्याशी संबंधित सर्व बाबींशी जलसाक्षरतेचा थेट संबंध आहे. स्थूल (चरलीे) पद्धतीने पाहिले, तर पाण्याबाबत जाणीव, जागृती निर्माण करणे म्हणजे जलसाक्षरता, असे म्हणता येईल; मात्र अधिक सूक्ष्म (चळलीे)  पद्धतीने विचार केला, तर एकूणच पर्जन्यचक्र, पाण्याचे विविध स्रोत, पाण्याचा एकूण पुरवठा व एकूण मागणी यांची माहिती देणे, नैसर्गिक पावसाचा थेंब न थेंब अडविणे व जिरविणे, नाले व नद्यांमधून वाहून जाणारे पाणी धरणे बांधून अडविणे व साठविणे, भूपृष्ठीय व भूमिजलाचे संरक्षण व संवर्धन करणे, अवास्तव भूमिजलाचा उपसा टाळणे व त्याच्या पुनर्भरणाचे प्रयत्न करणे, विविध कामांसाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे, मानवी वृत्तीमुळे होणारे पृष्ठीय व भूमिजलाचे प्रदूषण थांबविणे, विविध कामात होणारा पाण्याचा अपव्यय व गळती थांबविणे, पाण्याबाबतचे गैरसमज दूर करणे आदी विविध दृष्टिकोनांतून लोकजागृती निर्माण करणे म्हणजे जलसाक्षरता होय.

अर्थात, जलसाक्षरता ही संकल्पना फार जुनी आहे. अगदी वेदकाळापासून ते ब्रिटिश सत्ता अस्तित्वात येईपर्यंतच्या काळातील विविध राजसत्तांच्या काळात पाण्याबाबत जाणीव जागृतीवर म्हणजेच जलसाक्षरतेवर भर होता. पाण्याचा काटकसरीने वापर करणे व पाणी शुद्ध ठेवण्याकरिता ऋषीमुनींनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्या काळातील लोक पाण्याला अमृत मानत होते. जलसाक्षरतेचे महत्त्व आपल्या संत महंतांनाही पटलेले होते. त्यामुळेच त्यांनी लोकांना जलस्रोत निर्मिती व त्यांच्या शुद्धतेबाबत मार्गदर्शन केलेले दिसते. संत ज्ञानेश्वर म्हणतात की,

नगरेची रचावी। जलाशये निर्मावी॥ महावने लावावी। नानाविधे॥

याचाच अर्थ, ज्ञानेश्वरांनी पाण्याचे महत्त्व जाणून जलाशये निर्माण करणे आणि जंगल संपत्ती वाढविण्यावरही भर दिलेला होता. अशीच भूमिका अनेक संतांची होती; त्यांनीसुद्धा याबाबत आपले विचार मांडले असून पाण्याबाबत जनजागृती केलेली आहे.

आज आपण जलसाक्षरतेअभावी सर्वात मोठी किंमत मोजत आहोत. एकेकाळी आईसमान किंवा त्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जा लाभलेल्या नद्यांची गटारे बनली आहेत. आपल्या जीवनदायिनी नद्या आता मरणदायिनी बनू पाहात आहेत. कारण, प्रदूषित पाण्यामुळे माणसांबरोबरचे जलचर प्राणी, पशू-पक्षी यांचेही आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. प्रदूषित  पाण्यामुळे होणार्‍या आजारांवर आपणाला प्रचंड खर्च करावा लागत आहे. गमतीची बाब म्हणजे, यातून मार्ग काढण्यासाठी देशी व विदेशी कंपन्यांचे बाटलीबंद पाण्याचे पेव फुटले असून, आपण बाटलीबंद पाण्याच्या आहारी गेलो आहोत. पाण्याचा वापर उचित न करणे, वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, पाण्याचा पुनर्वापर न करणे, पाणी वापराचे योग्य नियोजन नसणे, पाणी न आडवणे, पाण्याच्या प्रदूषणाला हातभार लावणे अशा अनेक बाबींमुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पाण्याला अद्याप तरी पर्याय नाही, याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी वागणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी हा निसर्गाने आपणास दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्याचा प्रत्येकाने स्वतःसाठी मर्यादित वापर करून आपल्या भावी पिढीसाठी उरलेला साठा जपून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. जागतिक जल (पाणी) दिन जरी वर्षातून एकदाच येत असला, तरी आपल्यापैकी प्रत्येकाने दररोज, प्रत्येक तासाला पाणी वाचवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी संवर्धन विषयावर अधिक जागरूकता आणणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनाचे धडे शाळा, महाविद्यालये, उद्योग-व्यवसाय, गृहनिर्माण सोसायट्या अशा सर्वच स्तरांवर द्यायला हवेत. आजच्या काळाची हीच गरज आहे, तसेच जलसंस्कृतीचा वारसा जपणे म्हणजेच पाण्याचे योग्य नियोजन करणे हाच जलदिनाचा संदेश आहे.

-प्राचार्य डॉ. जे. के. पवार

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply