Breaking News

महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी

आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई ः बातमीदार

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोकरदार महिलांची प्रवासाची होणारी वाताहत पाहता नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्याकरिता विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या वेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना महामारीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर चार महिने नवी मुंबईसह मुंबईतील नोकरदार महिला विनावेतन रजेवर होत्या. सद्यस्थितीत अनलॉक सुरू झाल्यानंतर नवी मुंबईमधून मुंबईकडे किंवा मुंबईमधून नवी मुंबईकडे नोकरीसाठी महिलांचा प्रवास अनियमित होतो, परंतु सध्याच्या नियमावलीप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांना बस, ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना ऑटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नसल्याने शेवटी बस हाच एक पर्याय या महिलांसाठी आहे, परंतु कोविड नियमावली पाहता बसमधून प्रत्येक सीटवर एक प्रवासी व उभे पाच प्रवासी असा प्रवास करता येऊ शकतो.

बस डेपोमधून बसेस नेहमी भरून येत असल्याने उर्वरित बस स्टॉपवरील महिलांना बस मिळण्यासाठी साधारण दीड ते दोन तास वाट बघावी लागत आहे. एकूण बसथांबे पाहता कोणत्याही बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही. अशा वेळी महिलांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दुसरीकडे लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍या व शासकीय कर्मचार्‍यांनाच प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. नोकरदार महिलांची प्रवासाची होणारी वाताहत पाहता विशेष बस किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याबाबत एक महिला आमदार म्हणून अनेक महिलांची सातत्याने मागणी होत असून ही महिलांची व्यथा लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे याबाबतची मागणी करण्यात आली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply