कोरोनामुळे पोलीस दलात अस्वस्थता

बदल्या, आर्थिक व्यवहार, तक्रारींमुळे ताणतणावात वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त

चार हजारांहून अधिक मनुष्यबळ असलेले नवी मुंबई पोलीसदल गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सातत्याने ताणाखाली आहे. त्यातच पोलीस दलातील वरिष्ठ पदांवरील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्यामुळे अंतर्गत ताणही वाढला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी पोलीस दलात सारे काही आलबेल नसल्याचे दाखवून दिल्याची चर्चा आहे.

ऑगस्ट महिन्यात तक्रारदाराकडून 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, तर गेल्या 15 दिवसांत दोन पोलीस कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली. या तिन्ही घटनांमुळे पोलीस दलात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक निरीक्षक भूषण पवार यांनी 14 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, एका प्रकरणात पवार यांच्याविरोधात झालेली तक्रार आणि आर्थिक वाटाघाटी याला कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आत्महत्येपूर्वी काही दिवस पवार हे आपल्या मित्रांकडून काही रक्कम उसनी मागत होते, अशी माहितीही समोर येत आहे. ही घटना ताजी असतानाच खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांमुळे पोलीस दलातील काळी बाजू दबक्या आवाजात चर्चिली जात आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही काही पोलीस अधिकार्‍यांनी खासगीत सांगितले. दरम्यान, पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांनी आत्महत्यांमागे वैयक्तिक कारणे असल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस दलात कोणतेही वाद नसल्याचेही ते म्हणाले.

पोलीस कर्मचारी अथवा अधिकार्‍यांनी कर्तव्य बजावताना घरगुती ताण विसरून मुक्त वातावरणात काम करण्याविषयीचे समुपदेशन स्थानिक पोलीस ठाण्यात प्रत्येक पोलीस निरीक्षक करतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आत्महत्या हे

सर्व प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही, असा संदेश पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या सहकार्‍यांना समुपदेशनात द्यावा.

-बिपीन कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply