Breaking News

लॉकडाऊन काळात तरुणांनी फुलविला भाजीचा मळा

माणगाव : प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे शहरातून गावाकडे आलेले चाकरमानी तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग करून भाजीपाला पिकवत आहेत. शहरात नोकरी-व्यवसाय गमावलेले तरुण गावी शेतीकडे वळत असल्याने भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील, असे बोलले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे आले आहेत. पावसाळ्यापूर्वी आलेल्या या चाकरमान्यांनी घरी स्वस्थ न बसता आपल्या वाड-वडिलांच्या किंवा दुसर्‍याच्या जमिनीमध्ये भाजीपाला लागवड करून चांगले पीक घेत आहेत.

शहरातील रोजगार बुडाला म्हणून गावाकडे आलेल्या तरुणांनी स्वस्थ न बसता काकडी, शिराळी, पडवळ भुईमूग, रताळे इत्यादी पिकांची लागवड करून शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी कोणताही दुजाभाव न करता मदत केली.  शहरांमध्ये सध्या रोजगार नाही म्हणून हताश न होता कष्टाने फुलविलेला हा मळा बेरोजगार तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत. या तरुण शेतकर्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनामुळे मुंबईतून गावी आल्यावर नातेवाइकांच्या जमिनीत भाजीपाला लागवड केली. याकामी गावातील जाणकार शेतकरी मित्रांनी मदत केली. आता या भाजीतून दैनंदिन उत्पन्न मिळत आहे. यापुढे गावीच राहून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

-बाळाजी कालप, माणगाव

कोरोनामुळे गावी आलेल्या काही तरुणांनी शेती करायला सुरुवात केली. अशा तरुण मित्रांना आम्ही मार्गदर्शन केले. आधुनिक पद्धतीने भाजीपाला केल्याने त्यांना चांगला रोजगार मिळत आहे. यातून इतर अनेक जण प्रेरणा घेऊन शेती व्यवसायाकडे वळत आहेत. -साईनाथ पेणकर, आधुनिक शेतकरी, माणगाव

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply