Breaking News

दारासिंग स्मृतिदिन; स्टंट पहावेत तर त्याचेच…

मनमोहन देसाई निर्मित व दिग्दर्शित मर्द (1985)चा सुपर पॉवर नायक अमिताभ बच्चन साकारणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. बरं, पडद्यावर त्याची सोशिक, दु:खी कष्टी आई निरूपा रॉय साकारणार हेही समीकरण फिट्ट होते, पण ‘मर्द’चा पिता साकारण्यास तसाच भारी कलाकार हवा होता. सुपर मर्द म्हणा ना? सत्येन कप्पू नक्कीच शोभला नसता. (अशा कलाकार निवडीत दिग्दर्शक दिसतो). मनजींनी दारासिंगची निवड करून चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व मीडियाची दाद मिळवली आणि मर्द पडद्यावर आल्यावर ती निवड अगदी परफेक्ट होती हे पडदाभर दिसले. (काही अतिशयोक्ती दृश्यात दिसले, खरंतर)
दारासिंगच्या स्मृतिदिनानिमित्त अशा अनेक गोष्टी सांगता येतील. 12 जुलै 2012 रोजी दारासिंगचे निधन झाले तेव्हा मला अनेक गोष्टी आठवल्या. दारासिंगच्या निधनाचे वृत्त समजताच लगोलग जुहू येथील त्याच्या निवासस्थानी गेलो तेव्हा रणजीतपासून महेन्द्र संधुपर्यंत अनेक फिल्मवाले त्याच्या अंत्यदर्शनासाठी आल्याचे दिसले. चित्रपटसृष्टी या वृत्ताने हळहळली होती. दारासिंगने चित्रपटसृष्टीत माणसे जोडली होती.
मला दारासिंगने भगवान शंकराची भूमिका साकारलेल्या चंद्रकांत दिग्दर्शित तुलसी विवाह (1972) या चित्रपटाची आठवण आली. गिरगावात राहत असताना आमच्या खोताची वाडीच्या समोरच असलेल्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात तुलसी विवाह या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाच्या आवारात भव्य अशी शंकराची मूर्ती उभारली जात होती. माझे ते शालेय वय. संपूर्ण गिरगावकरांना या मूर्तीच्या उभारण्यात विशेष रस. त्या काळात दक्षिण मुंबईतील चित्रपटगृहावरील डेकोरेशन हा कायमच आकर्षणचा विषय असे आणि त्या दिवसात गिरगावात एक कुजबुज होती. या शंकरमूर्तीची उभारणी पाहण्यास एकदा खुद्द दारासिंग येऊन गेला. काही कारणास्तव तुलसी विवाह चित्रपट मॅजेस्टिकऐवजी जवळच्याच सेन्ट्रल चित्रपटगृहात प्रदर्शित केला गेला. आणि तेथे ती मूर्ती उभी राहिली.
दारासिंगचं आपलं एक वेगळेच वैशिष्ट्य होते. दारासिंगची उघड्या निधड्या पिळदार बळकट छातीचे पडदाभर भरभरून दर्शन प्रदर्शन घडवणारा फौलाद (1963) हा चित्रपट त्याच्या वैशिष्ट्याची जाणीव करुन देणारा. ’तुफान’ (1968)देखील दारासिंगचा बहुचर्चित स्टंटपट. देमार घेमार अशी दे दणादण खासियत. (कालांतराने अमिताभ बच्चनच्या मनमोहन देसाईच्या चित्रपटाचे नाव ’तुफान’ (1989) होते. दारासिंगने साठच्या दशकात जे पेरले ते काही वर्षांनी अमिताभ बच्चनपटात तर त्यानंतर आणखी काही वर्षांनी सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’सारख्या चित्रपटात उगवले. चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत अशा अनेक गोष्टींसह रंगत आली आहे.)
दारासिंगच्या दे मार चित्रपटांना मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात स्थान मिळत नसे. म्हणून त्याने हार मानली असे थोडेच आहे? त्या काळात तशा चित्रपटांसाठी आपली एक जागा होती. त्याचा आपला एक प्रेक्षकवर्ग होता. त्यांच्या त्या ढिश्यूम ढिश्यूम मारधाड पिक्चर्सचे मेन थिएटर मध्य मुंबईतील पिला हाऊस एरियातील गुलशन, निशात, ताज (’फौलाद’चे मेन थिएटर हेच होते), न्यू रोशन, दौलत, रॉयल आणि जवळचीच मोती, सुपर अशी चित्रपटगृहे असत. खच्चून टाळ्या आणि शिट्ट्या यांची हाऊसफुल्ल गर्दीत रेलचेल. पोस्टरभर फायटींग रूपडं आणि षोडशी नायिका असे. दिग्दर्शकाला असं कॉम्बिनेशन कसं बरं सुचे हे समजत नसे. जे काही असेल ते पण हा सुपर हिट फॉर्म्युला होता. सत्तरच्या दशकात ’फायटींगलाही अ‍ॅक्टींग लागते’ यावर शिक्कामोर्तब झाले. त्याची शक्तीशाली पेरणीच जणू दारासिंगने केली. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे हॅन्डसम हिरो जबरा फायटींग करतात हा अभिनय दाद देण्यासारखा झाला. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्हीएफएक्स, एआय व शस्त्र यांची रूपेरी पडद्यावर जणू महायुतीच दिसते. पठाण, जवान, कांतारा, केकेआर, केजीएफ (पहिला व दुसरा), टायगर 3, निमल, पुष्पा, कांतारा, पुष्पा 2 असं करत करत कुबेरा’पर्यंत रूपेरी पडद्यावरचा विध्वंस वाढला. हिंदीत एकेकाळी दारासिंगच्या स्टंटपटाचे युग होते आणि त्याच अ‍ॅक्शनपॅक्ड मसालेदार मनोरंजक चित्रपटात साऊथचा पिक्चर भारी आहे. त्यात दारासिंगने जे पेरलयं, ते उगवलयं असेही म्हणता येईल. चित्रपटाचा प्रवाह असा वाहता असतो.
ही सगळी स्थित्यंतरे एका फ्लॅशबॅकचा विषयच. चित्रपटाच्या अभ्यासक्रमात स्टंटपटाना अजिबात महत्त्व नसेलही, पण साठच्या दशकात अशा मारधाड पिक्चर्सची जबरा क्रेझ होती. त्यांची नावे भन्नाट, स्टोरी नाट्यमय, गीत संगीत नृत्याचा तडका जबरा, पोस्टरभर अ‍ॅक्शन, त्यांचं रिलीज ताज, न्यू रोशन वा निशातसारख्या थिएटर्सना, त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग हा पडद्यावरच्या जगात हरवून हरखून जाणारा. सेन्सॉर प्रमाणपत्र, दारासिंगच्या धिप्पाड एन्ट्रीला हमखास टाळ्या नि शिट्ट्या देणारा, सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या बसक्या खुर्चीत बसून पडद्यावरच्या दारासिंगला प्रोत्साहन देणारा, चिअर्स करणारा. हा पब्लिक ’चित्रपटात कुठे बरे दिग्दर्शक दिसला?’, ’काय भारी शॉट लावला होता?’, ’मेंदू कुरतवणारा शॉट होता’, प्रतिकात्मक दृश्य उल्लेखनीय, चित्रपट समाज प्रबोधन करतो असं काहीही पाहत नसे. डोक्याला कसलाही शॉट न लावता (दिमाग का दही न करता) हे पिक्चर्स एन्जॉय केले जात. मुख्य प्रवाहातील थेटरात ते मॅटीनी शोला येत. मी गिरगावातील गल्ली चित्रपटात दारासिंग, मुमताज, शेख मुख्तार, रंधवा, बेला बोस, देव कुमार यांचे स्टंटपट एन्जॉय करीत असे. साऊंड सिस्टीम नीट नसेल तर तोंडाने आवाज काढत असू, ढिश्यॅव दिश्यॅव, ढिश्यूम ढिश्यूम. काय ते भारी दिवस होते हो.
दारासिंगच्या स्टंटपटाचे प्रगती पुस्तक सांगायचे तर, किंगकॉग’(1962) ते ’फौलाद के दुश्मन’ (1968) असं पण कायमचाच ठसा उमटलाय. रुस्तम ए बगदाद, आवारा अब्दुल्ला, सॅमसन, आया तुफान, ऑन्धी और तुफान, रुस्तम ए हिंद, बॉक्सर, टारझन कम टू दिल्ली, शेरदिल, राका, सात समुंदर पार, लुटेरा, दादा, डंका, तुफान वगैरे वगैरे. या प्रत्येक पिक्चरमध्ये ’स्टोरी’ आहे, पण ती काहीही असली तरी अडत नसे. पिक्चरमध्ये भरपूर मसाला आहे एवढं पुरेसे असे.
’फौलाद’ची गोष्ट मुल्कराज बाकरी व फारुख कैसर यांची. चित्रपटाची निर्मिती विनोद जोशी व रजनी देसाई यांची. दिग्दर्शन मोहम्मद हुसैन यांचे. संगीत जी.एस. कोहली यांचे आणि चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली ओ मतवाले साजना, यहां तो कांटे मौत से जिंदगी, याद तेरी आयेगी ही गाणी लोकप्रिय होती. चित्रपटात अमर (दारासिंग) आणि राजकुमारी पद्मा (मुमताज) यांची योगायोगाने खच्चून भरलेली प्रेमकथा. चित्रपटात रंधवा, मिनू मुमताज, श्यामकुमार, रत्नमाला, परवीन पॉल, कमल मेहरा, रणधीर इत्यादींच्याही भूमिका. ब्रॉडवे पिक्चर्स बॅनरच्या या चित्रपटाचे छायाचित्रणकार सुलेमान व अनंत वड्डेकर यांचे तर संकलन के.बी. भडसावळे यांचे.
दारासिंगच्या मारधाड पिक्चर्सचं आपलं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याच चौकटीत वा फ्रेममध्ये ते पिक्चर्स एन्जॉय केले तरच ते मस्त टाईमपास करत. अशा अनेक स्टंटपटात नायिका साकारूनही मुमताजने अनेकांच्या नाकावर टिच्चून आपली गुणवत्ता, सौंदर्य व मेहनत या गुणांवर मेन स्ट्रीममधील चित्रपटात आपली ओळख निर्माण केली हेदेखील वैशिष्ट्यपूर्ण. मुमताज दारासिंगची हुकमी नायिका म्हणून त्या काळातील अनेक हिरोंचा जळफळाट झाला असेल तर त्यात आश्चर्य ते काय? तिला ज्युनियर डान्सर ते नायिका असा प्रवास करण्यास दारासिंगचीच शक्ती उपयुक्त ठरली. ती दारासिंगची नायिका म्हणून शशी कपूरने राज खोसला दिग्दर्शित दो रास्ते चित्रपटात तिला नायिका म्हणून स्वतः चक्क नकार दिल्याचा किस्सा खूप गाजला.
दारासिंग म्हटलं की मुमताज आठवते आणि खुद्द मुमताजही दारासिंगला विसरली नाही. दारासिंगचा मुलगा विंदो दारासिंग रूपेरी पडद्यावर विशेष काही चमकदार करु शकला नाही आणि फराहशी लग्न करुनही त्यात अपयशीच ठरला. दारासिंगच्या खात्यात तेवढेच एक अपयश.
दारासिंगने एकिकडे स्टंटपट गाजवतानाच दुसरीकडे जय बजरंगबली इत्यादी अनेक पौराणिक चित्रपटातूनही भूमिका साकारल्या. कालांतराने
चरित्र भूमिकेकडे मोर्चा वळवला. त्यात मेरा नाम जोकर, आनंद, धरम करम, मेरा देश मेरा धर्म, मर्द, कर्मा, प्रेम दीवाने, अजूबा, कल हो ना हो, शरारत, जब वी मेट वगैरे अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या. रामानंद सागर यांच्या सागर प्रॉडक्सन्सच्या रामायण या गाजलेल्या लोकप्रिय मालिकेत दारासिंगने साकारलेला हनुमान प्रचंड गाजला. दारासिंगची भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2003 ते 2009 या काळात राज्यसभेवर निवड करण्यात आली.
सत्तरच्या दशकात मुंबईत वरळीतील वल्लभभाई स्टेडियमवर फ्री स्टाईल कुस्त्यांचे आयोजन करण्यात येई, त्यात दारासिंग जगभरातील विविध देशांतील कुस्तीवीरांना अस्मान दाखवत असे. आपल्या बलाढ्य ताकदीवर तो एकेका कुस्तीवीरांना लिलया लोळवत असे. त्यात फिक्सिंग असे अशी कितीही कुजबुज असली तरी दारासिंगला टाळ्या शिट्ट्यांनी प्रोत्साहन देण्यास प्रत्येक शनिवारी तुडुंब गर्दी असे… शक्तीशाली कुस्तीपटू अशीही दारासिंगची ओळख होती.
दारासिंगचे प्रगती पुस्तक असे अनेक गुणांचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत त्याचंही आपलं एक स्थान आहे.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply