Breaking News

पुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला

 ‘जैश-ए-मोहम्मद’चे तळ उद्ध्वस्त; सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायुसेनेने मिराज या लढाऊ विमानांद्वारे मंगळवारी (दि. 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास थेट पाकमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले असून, सुमारे 350 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मिराज 2000 या लढाऊ विमानांच्या ताफ्याने सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताच्या विमानांनी 21 मिनिटे कारवाई केली. यात बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी येथील ‘जैश’चे तळ उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सुमारे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.

या हल्ल्यात किमान साडेतीनशे जणांचा खात्मा झाला. त्यात 325 दहशतवादी; तर 25 शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत काश्मीर खोर्‍यात अखनूर, नौशेरा, पूंछ, राजौरी भागात जोरदार गोळीबार सुरू केला. त्यालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

देश सुरक्षित हातांमध्ये : मोदी

चुरू : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या जवानांच्या शौर्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलाम केला आहे. राजस्थानमधील चुरूमध्ये जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले, तसेच देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असे ठामपणे सांगितले. याचबरोबर मोदींनी 2014मध्ये एका कवितेतून देशाबद्दलच्या आपल्या भावना ज्या कवितेतून व्यक्त केल्या होत्या, तीच कविता आपल्या भाषणाची सुरुवात करताना पुन्हा सादर केली. ‘देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं रुकने दूंगा’ अशी कविता त्यांनी म्हणत वीर जवान आणि जनतेला मानाचा मुजरा केला.

जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतात आणखी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.  त्यासाठी बालाकोट परिसरात विविध तळांवर प्रशिक्षण सुरू होते, मात्र पाकिस्तानने पावले उचलली नाहीत. म्हणून भारतीय हवाई दलाने ही विनालष्करी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
-विजय गोखले, परराष्ट्र विभागाचे सचिव

भारतीयांच्या मनात होते तेच झाले : मुख्यमंत्री

मुंबई : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होते, तेच झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सैन्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही भारतीय हवाई दलाचे व सैन्याचे अभिनंदन केलेे. ते म्हणाले, भारतीय सैन्याचा मला अभिमान वाटतो. आमच्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही हेच आमच्या सैन्याने पाकिस्तानला दाखवून दिले आहे.

‘जी काळजी घ्यायची ती आम्ही घेत आहोत. सर्व यंत्रणा सतर्क आहेत,’ असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एअर स्ट्राइकच्या खंबीर निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.

भारतीय लष्कराने ट्विट केली कविता

एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने एक कविता प्रसिद्ध केली आहे. लष्कराने ट्विट केलेली ही कविता सुप्रसिद्ध हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांची आहे. शत्रूसमोर तुम्ही नम्र आणि सौम्य राहिलात की तो तुम्हाला भेकड समजू लागतो. कौरवांनीही पांडवांना अशीच वागणूक दिली होती, पण तुम्ही तसे समजू नका, असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे.

संपूर्ण भारतभर आनंदोत्सव

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करीत सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. याबद्दल देशभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.   अनेकांनी मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष केला आणि जवानांचे कौतुक केले, तसेच सरकारलाही धन्यवाद दिले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply