Breaking News

राम मंदिर भूमिपूजन सोहळा

पवित्र जल आणि मातीने होणार पायाभरणी

अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी (दि. 5) होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत ज्यांनी देशभरातील 150पेक्षा जास्त नद्यांचे पाणी जमा करून राम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या गाठली आहे.
यातील राधेश्याम पांडे सांगतात की, 1968पासून आम्ही 151 नद्या, आठ मोठ्या नद्या आणि तीन समुद्रांमधून पाणी जमा केले आहे तसेच श्रीलंकेतील 16 ठिकाणाहून माती गोळा केली आहे.
राम मंदिर निर्माणासाठी देशभरातील विविध भागांमधून सिद्ध व शक्तिपीठांची माती व नद्यांचे पवित्र जल अयोध्येत पोहचवले जात आहे. नद्यांच्या पाण्याचा व मातीचा उपयोग भूमिपूजनवेळी केला
जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भूमिपूजनासाठी पश्चिम बंगाल व बिहारमधूनदेखील माती व नद्यांचे पाणी अयोध्येत येत आहे.
मुस्लिम भाविक उपस्थित राहणार
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी छत्तीसगडमधील एक मुस्लिम भाविक आठशे किलोमीटरचा प्रवास करून अयोध्या येथील सोहळ्यास हजर राहणार आहे. मोहम्मद फैज खान असे या भाविकाचे नाव असून, तो छत्तीसगडमधील चांदखुरी गावचा रहिवासी आहे. या सोहळ्यासाठी मोहम्मदने आपल्या गावातली माती आणली आहे. भगवान श्रीराम यांची आई कौसल्या यांचे जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे.
अयोध्येत कडेकोट पोलीस बंदोबस्त
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार्‍या राम मंदिर भूमिपूजनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येचे उपमहानिरीक्षक दीपक कुमार यांनी तेथील सुरक्षेची माहिती देताना कोविड प्रोटोकॉल पाळला जाणार असून, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल, असे स्पष्ट केले.
आम्ही ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गांवर नजर ठेवत आहोत. बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी आहे. अयोध्येत राहत असलेल्या लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल, पण गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन लोकांना करण्यात आल्याचेही दीपक कुमार यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply