पनवेल : बातमीदार
देशात कोरोनासारख्या महामारीचा सामना करायचा असल्यास देशातील प्रत्येक नागरिकांचे ई हेल्थकार्ड असले पाहिजे, तर या महामारीचा सामना करणे सोपे जाईल, असा सल्ला देणारा शोधनिबंध पनवेलच्या डॉ. सागर कांबळे यांनी तयार केला आहे. ई हेल्थकार्ड कसे बनवावे, याचा उपयोग कसा होऊ शकतो आणि देशाला याचा काय फायदा होऊ शकतो, अशी माहिती असलेला शोधनिबंध नुकताच युरोपातील आरोग्यविषयक माहिती देणार्या आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.पनवेल तालुक्यातील रसायनी भागात नामांकित एमडी डॉक्टर म्हणून काम करणारे डॉ. कांबळे यांनीकोरोना रुग्णांवरही उपचार केले. लॉकडाउनच्या काळात काम करत असताना कोविड 19 या चीनमधून जगभर पसरलेल्या आजारावर मात करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना करोनाची लागण होवून जीव गमवावा लागला. भविष्यात पुन्हा अशा महामारीचा सामना करण्यासाठी भारताला पूर्वतयारी करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन डॉ. सागर कांबळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिता वानखेडे यांनी त्यांना आलेल्या अनुभवावरून शोधनिबंध तयार केला. भारतात केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार्या आरोग्य सर्वेक्षणातून दर पाच वर्षांनी आरोग्य अहवाल तयार केला जातो. या अहवालातून देशाचे आरोग्यविषयक धोरण ठरविले जाते. मात्र हे सर्वेक्षण पुरेसे नसून देशातील प्रत्येक नागरिकांचे ई हेल्थकार्ड असणे गरजेचे आहे. ई हेल्थकार्ड अॅप विकसित करून खासगी डॉक्टर, रुग्णालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांची माहिती गोळा करायची. प्रशासकीय यंत्रणांकडे ही माहिती एकत्रितपणे गोळा झाल्यास सरकारला यावर काम करणे सोपे होणार आहे, देशातील नागरिक कोणत्या आजाराने त्रस्त आहे, कोणत्या वयोगटातील लोकांना कोणता आजार आहे, कोणत्या आजाराने देशात मृत्यू होतात ही माहिती एकत्र झाल्यास करोनासारखी जागतिक महामारी उद्भवल्यास त्यावर उपाययोजना करणे सोपे जाईल, असे मत डॉ. सागर कांबळे आणि त्यांची पत्नी डॉ. प्रणिता वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाउनच्या काळात त्यांनी तयार केलेला अभ्यासपूर्ण अहवाल जागतिक स्तरावर प्रसिद्ध करणार्या युरोपातील आयओएसआर जर्नल या मॅगझिनकडे पाठविा होता. 14 जुलैला त्यांनी युरोपातील या संस्थेकडे ही माहिती पाठविल्यानंतर आरोग्यविषयक पथकाने त्यातील सत्यता पडताळून डॉ. कांबळे यांचा हा शोधनिबंध 29 जुलैला प्रसिद्ध केला. ई हेल्थकार्ड अॅप तयार करण्यासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. आधारकार्डच्या साहाय्याने याची गुप्तता पाळणेही सोपे असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले आहे. केवळ करोनासारख्या नव्हे तर लहान-मोठ्या साथीवर मात करण्यासाठीही याचा उपयोग होईल, अशा सूचना त्यांनी या शोधनिबंधात केल्या आहेत.
परदेश दौरे करणार्या नागरिकांवर लक्ष
परदेशातून भारतात ये-जा करणार्या नागरिकांवर या ई-हेल्थकार्डमुळे लक्ष राहील. परदेशात गेलेल्या नागरिकाला कोणते आजार आहेत, याची नोंद विमानतळावर ई-हेल्थकार्डमुळे होईल, परदेशात जाणार्या कोणत्या व्यक्ती, कोणत्या आजाराने त्रस्त आहे, त्यांची नोंद होऊन त्यांच्यावर या अॅपमुळे लक्ष ठेवता येईल, अशी नोंद त्यांनी यात केलेली आहे.
ई-हेल्थ मोबाइल अॅपचे अधिकार केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेला देऊन देशातील प्रत्येक नागरिकांची माहिती अॅपवर उपलब्ध होईल. यामुळे इथल्या आरोग्य यंत्रणेला आरोग्यविषयक प्रश्नांवर काम करणे सोपे जाईल. अशी माहिती एकत्र झाल्यास आरोग्याच्या प्रश्नांचे गांभीर्यही संबंधित यंत्रणेला कळेल आणि त्यावर उपाययोजना करता येतील म्हणून हा प्रयत्न मी केला आहे.
-डॉ. सागर कांबळे, एमडी