पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेलच्या सेक्टर दहामधील राधाकृष्ण मंदिरात जपलेल्या नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण असा श्रीकृष्ण जन्मोत्सव नुकताच साजरा झाला. यंदा उत्सवाचे सलग 20 वे वर्ष आहे. यंदाच्या उत्सवात कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करत फक्त पूजा करण्यात आली होती. वय वाढत जातं तसं नात्यांचे अर्थ बदलत जातात. पण या बदलांबरोबरच येणारी प्रगल्भता इथे यशस्वी झाली. 2001 मध्ये नवीन पनवेल विकसित होत होते. तीर्थ दर्शन या इमारतीत तळमजल्यावर कृष्णाची एक मूर्ती होती. शेजारी शेजारी राहणारे संतोष तांबोळी व रमेश वायदंडे ही कुटुंबे भाविक. इमारतीतील त्या मूर्तीची ते नियमित दैनंदिन पूजा करून गोकुळअष्टमी साजरी करत. एकदा झाले असे की त्या कृष्णमूर्तीला गाय चाटू लागली. चाटताचाटता ती मूर्ती पडून तिचे तुकडे झाले. गाय तर निघून गेली, पण तांबोळी व वायदंडे कुटुंबाला चुटपूट लागली. काही लोकांशी चर्चा केल्यावर त्यांना उपाय सापडला. त्याच ठिकाणी राधाकृष्णाचे छोटेखानी मंदीर बांधण्याचे त्यांनी ठरविले. नवीन पनवेलमधील सेक्टर 13 च्या अय्यप्पा मंदिराची प्रतिकृती असलेले छोटेखानी मंदीर दोन कुटुंबानी उभारले अन् त्यात स्थापना केली आकर्षक व प्रसन्न अशा राधाकृष्णाच्या मूर्तीची. अन् या राधाकृष्ण मंदीरात श्रीकृष्णजन्मोत्सवाची परंपरा आज वीस वर्षे अखंड चालू आहे. पहातापहाता परिसरातील नागरिकांची उपस्थिती वाढू लागली. तांबोळी व वायदंडे कुटुंबीयांची श्रद्धा वाढू लागली अन् या उत्सवाने मोठे रूप धारण केले. उत्सवाचा खर्च मात्र ही दोनच कुटुंबे करतात हे वैशिष्ट्यपूर्ण. आमच्या कुटुंबांचे व्यवस्थित चालू आहे ते राधाकृष्णाच्या कृपेनेच ही श्रद्धा उत्सवाची परंपरा टिकविण्यासाठी त्यांना बळ देत आहे. जन्मोत्सवानंतर दहीहंडीचा कार्यक्रम धार्मिक स्वरूपात साजरा होतो. चातुर्मासात काकड आरतीदेखील केली जाते. यंदाची पूजा सौरभ तांबोळी व रुपेश हिरे यांनी केली. आपण एकत्र आलो तर सामूहिक शक्ती उभारून अनेक संकटे एकत्रितपणे सहज दूर करू शकू. आपल्या पाठीशी कृष्ण उभा असतांना सकारात्मक कृतीतून आपली प्रगती नक्कीच होत राहील हे त्यांचे विचार 20 वर्षे अखंड सुरू असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कृष्णजन्मोत्सावाविषयी बरेच काही सांगून जातात.