Saturday , June 3 2023
Breaking News

‘अटल करंडक’ स्पर्धा नव्हे; तर चळवळ!

ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने यांनी व्यक्त केल्या भावना  

पनवेल : नितीन देशमुख
अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय आहे. गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरातील कलाकार यामध्ये भाग घेतात. स्पर्धक एकत्र येतात तो क्षण आम्हाला अनुभवायला मिळतो, जो आजच्या घडीला तितकाच अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच प्रवास प्रत्येक एकांकिका आणि कलाकाराचा आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही तर चळवळ म्हणून चालवली जाते, अशा शब्दांत या स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओमकार भोजने यांनी पुढे बोलताना सांगितले की, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून माझी निवड झाली तेव्हा मला प्रश्न पडला होता, कारण एकांकिका विश्वात ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ही संकल्पना तेवढीशी रूजलेली नाही. आता आपण फक्त खात्री देतोय की आपण स्पर्धा करतोय. म्हणजे चांगल्या दिशेवर किवा ट्रॅकवर आहोत त्याचे ते प्रतीक आहे. त्यामुळे मला आनंद झाला. हो आपण होऊ शकतो किंवा असायला हवे. मला वेगळे वाटायला नको की मी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे, तर कोण वेगळे नाही. आपण सगळ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांसारखेच आहोत.
मला फक्त प्रेक्षक, परीक्षक, स्पर्धक आणि आयोजक यांच्याबरोबर बसायला मिळत आहे. मी फक्त पुणे केंद्रावर एकांकिका पाहिल्या. स्पर्धेची वातावरण निर्मिती होण्यासाठी काही रील्स, व्हिडीओदरम्यान काही जुन्या गोष्टीसाठी स्टेजवर येता आले. धम्माल आली. एवढ्या मोठ्या मान्यवर परीक्षकांसोबत एकांकिका संपल्यावर चर्चा करता आली. ते माझ्यासाठी नवीन होते. परीक्षक नेमके काय विचार करतात ते जवळून बघता आले. या सगळ्या परंपरेच्या गोष्टी आहेत ज्या टिकून आहेत त्या सहज आपल्याला इतक्या जवळून बघता येत नाहीत. त्या मला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पाहायला  मिळाल्या, असा अनुभव ओमकार भोजने यांनी सांगितला.
अटल करंडक स्पर्धेत मी प्रथम कोकणातून चिपळूणच्या कॉलेजमधून  भाग घेतला होता. त्यानंतर मुंबईतील अनुभूती संघातून भाग घेतला आणि ’इनसर्स ऑफ’ ही एकांकिका केली असता, मला अंतिम फेरीत भाग घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही पहिले आलो. मजेशीर अनुभव होता. माझी आता सुरुवात आहे. माझ्याकडे काहीही नाही. गावाकडून आलोय.
मुंबई, पुण्यासारख्या शहरात मोठे कलाकार आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करीत आल्याने आम्हाला शिकायला मिळाले. त्यातला एक कोणी तरी म्हणून मी  ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. माझी काही वेगळी कारकीर्द किंवा काम नाही. मला एकच बक्षीस मिळालेले तेही याच स्पर्धेतील. कलर्स मराठीचे तीन शो कोमॅडीची जीएसटी एक्स्प्रेस, तुमच्यासाठी कायपण आणि एकदम कडक त्यानंतर हास्य जत्रा. त्यामुळे माझा काय विशेष प्रवास नाही, असे ओमकार भोजने यांनी नम्रपणे म्हटले.
येणारे नवीन टॅलेंट भुकेले आहे. अटल करंडकमध्ये यंदा बोलीभाषा, लोककला यांचाही एकांकिकेसाठी विचार केला, हे वेगळेपण आहे. नाही तर बोलीभाषा किवा लोककलेवर आधारित अशीच स्पर्धा असते. या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गवारीतून आपण त्यांचा विचार करतोय. खरे तर ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून ते मी सुचवले होते. आयोजकांनी ते मान्य करून बक्षिसे ठेवली याचा मला आनंद आहे, असे भारावलेल्या ओमकार भोजनेंनी सांगितले.
आयोजकांबद्दल बोलायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. असे निवडक लोक असतील जे आपल्याबरोबरच इतरांनाही सामावून घेतात. युवा पिढीला आताचे जे वातावरण आहे ते जास्त पुढे न्यायचे आहे. म्हणून सगळे एकत्र येतोय. त्यातले एक अटल करंडक. ते सगळ्यांनाच आपले मानतात. आपली आता केंद्र वाढली. प्रतिसाद चांगला मिळतोय. म्हणजेच अटल करंडकवर प्रेम वाढतेय. तो मंच आपला वाटणार्‍या कलाकारांची, प्रेक्षकांची संख्या वाढतेय हे अटल करंडक स्पर्धेचे यशच आहे, असे ओमकार भोजने यांनी नमूद केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply