नागपूर ः प्रतिनिधी
प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर डॉक्टर पत्नीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे ले-आऊट येथे मंगळवारी (दि. 18) दुपारी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानी नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
धीरज डिंगाबर राणे (42), त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (39), मुलगा ध्रुव धीरज राणे (11) आणि मुलगी लावण्या उर्फ वण्या धीरज राणे (5) अशी मृतांची नावे आहेत. धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभागप्रमुख, तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या.
राणे दाम्पत्याकडे धीरज यांच्या आत्या प्रमिला (65) या राहतात. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी धीरज यांना आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. प्रमिला यांनी आरडाओरड केली तेव्हा शेजारी जमले. एका शेजार्याने सुषमा यांचे भाऊ रितेश सिंग यांना ही माहिती दिली. माहिती मिळताच ते ओमनगर येथे आले. दरम्यान, एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निलोत्पल, कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहचला.
धीरज, ध्रुव आणि वण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले, तर बाजूलाच पंख्याला डॉ. सुषमा या गळफास लावलेल्या पोलिसांना दिसून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले आहेत. तूर्त कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.