Breaking News

महाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 12वर

97 पैकी 78 जण बचावले; 19 लोक बेपत्ता

महाड : प्रतिनिधी
येथील इमारत दुर्घटनेतील बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी उशिरापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकूण 97 पैकी 78 जण बचावले आहेत, तर अद्याप 19 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर आल्याने बचावले. दुर्घटनेनंतर पोलीस आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या. यामध्ये महाबळेश्वर येथून आलेल्या एका पथकाने शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर एनडीआरएफचे जवानदेखील पोहोचले. शिवाय महामार्ग कामातील एल अ‍ॅण्ड टी कंपनीची यंत्रणा दाखल झाली.
या दुर्घटनेत आतापर्यंत 78 जण बचावले असून, 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये नाविद झमाने (35), नौसिन नदीम बांगी (30), अदिम हाशिम शैकनग (16), रोशनबी देशमुख (56), ईस्मत हाशिम शैकनक (42), फातिमा अन्सारी (40), अल्लतिमस बल्लारी (वय 27), शौकत आदम अलसूलकर (वय 50), रुकय्या नौशिन बांगी (7) व एक अनोळखी स्त्रीचा समावेश आहे तसेच शेजारील इमारतीमधील सय्यद अमित समीर (45) यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, महाड ट्रामा केअरचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आदी वैद्यकीय अधिकारी जखमींवर उपचारासाठी पराकाष्ठा करीत आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर फारूक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली झमाने, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे अशा पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देव तारी त्याला कोण मारी!
महाड इमारत दुर्घटनेला 18 तास लोटून गेल्यानंतर ढिगार्‍याखालून कोण बचावले असतील की नाही याबाबत शंका असतानाच मंगळवारी दुपारी 1.15 वा. महंमद बांगी या चार वर्षांच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आली.
दोषींवर कठोर कारवाई करा -दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी रात्रीच दुर्घटनास्थळाला भेट देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच राज्य सरकार अशा धोकादायक इमारतींबाबत गंभीर नाही, असा आरोप केला. महाड तालुक्यातील आपत्तीचे प्रकार पाहता या ठिकाणी एनडीआरएफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प असावा, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनीदेखील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply