नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याच्या मोहिमेस मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत याची सुरुवात करण्यात आला.
ही मोहीम शहरातील प्राथमिक शाळांच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांत ही मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्येक शिक्षिका तसेच सेविकांना विविध भाग देण्यात आले आहेत. तीन दिवसांत ही मोहीम पूर्ण केली जाईल, असे आश्वासन या महिला कर्मचार्यांनी या वेळी दिले. नेमून दिलेल्या प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणे बंधनकारक असल्याची सूचना या वेळी किशोर जैन यांनी संबंधित महिला कर्मचार्यांना देताना शहराच्या विविध विभागांत सरपंच डॉ. धात्रक यांच्यासह स्वतः फिरून सर्व घरांमध्ये संबंधित तपासणी झाली आहे का, याची माहिती घेणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले.