कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील कळंब गावातील गृहिणी असलेली 22 वर्षीय महिला 13 ऑगस्ट रोजी सकाळी पोश्री नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता वाहून गेली होती. या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला असून पतीचे अन्य महिलेबरोबर असलेले संबंध व सतत होणार्या मारहाणीमुळे करुणा सचिन बदे यांनी पोश्री नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचा पती सचिन बदे कळंब गावातील कर्जत-मुरबाड रस्त्यावरील बाजारपेठेत फुलांचे दुकान चालवतो. त्याचे लग्नाच्या आधीपासून बोरगावमधील एका महिलेबरोबर मैत्रीचे संबंध होते. त्या महिलेचे डोंबिवली येथील व्यक्तीबरोबर लग्न झाले होते, मात्र ती महिला गेली काही महिने माहेरी बोरगाव येथे राहते. नवर्याला सोडून माहेरी आल्यावर सचिन व त्या महिलेची मैत्री वाढली. त्यामुळे करुणा व सचिन यांच्यात दररोज भांडणे व्हायची. गेली काही दिवस नवरा सतत मारहाण करीत असल्याने मनस्थिती ठीक नसलेली करुणा कळंब गावात फिरायची. 13 ऑगस्टला सकाळी आपल्या लहान बाळाला शेजारी ठेवून घरातून कपडे धुण्यासाठी ती बाहेर पडली होती. दोन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पोश्री नदीपात्र पाण्याने भरून वाहत होते. या वेळी ओसंडून वाहणार्या नदीच्या पाण्यात उडी घेऊन करुणाने स्वतःला संपविले.
ही माहिती मिळताच कळंब गावातील ग्रामस्थ नदीवर असलेल्या पुलावर पोहचले होते. पाषणे येथील उल्हास नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व पोलीस थांबून होते. दिवसभर शोध घेऊनही करुणाचा मृतदेह हाती लागला नव्हता. काही ग्रामस्थ थेट टिटवाळा येथील रायता पुलावर, तर काही कल्याण खाडी येथे पोहचले होते, मात्र तीन दिवस शोध लागला नव्हता. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे उल्हास नदी परिसरात करुणाचा मृतदेह आढळला होता.
या प्रकरणी मृत महिलेचे वडील बंधू सत्रे यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे आपल्या मुलीचा नवरा सचिन बदेकडून छळ होत होता. अन्य एका महिलेशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांमुळे आपल्या मुलीला आत्महत्या करावी लागली अशी तक्रार नोंदविली. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्यात हुंडा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भा. दं. वि. कलम 498 अ आणि 306नुसार सचिन बदेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याआधी 13 ऑगस्टला आकस्मिक मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात झाली होती. दरम्यान, नेरळ पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी अधिक तपास करीत आहेत.