Breaking News

भोरमाळ येथील मुलाला विषबाधा; समाजसेवकाचा मदतीचा हात

पेण ः प्रतिनिधी

आपल्या वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मुलास गवत मारण्याच्या विषारी औषधातून विषबाधा झाल्याची घटना पेण तालुक्यातील कामाली भोरमाळ आदिवासीवाडी येथे घडली आहे. तुकाराम कडू हे रविवारी (दि.16) सायंकाळी 4 वाजता आपल्या शेतावर गवत मारण्याचे औषध फवारणीसाठी गेले होते. आपल्यासोबत ते आपल्या अथर्व कडू या मुलालाही घेऊन गेले, मात्र घरी आल्यानंतर रात्री उशिरा मुलाच्या पोटात व छातीत दुखू लागले.

पेण तालुक्यातील भोरमाळ आदिवासीवाडी अत्यंत दुर्गम भागात असल्याने सदर मुलास दुसर्‍या दिवशी सकाळी पेण येथील महाजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तब्बल 10 तास होऊनही मुलगा शुद्धीवर येत नसल्याने डॉक्टर शशांक महाजन यांनी मुलास पुढील उपचारासाठी तत्काळ पनवेल किंवा मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला.

सदर परिवाराची परिस्थिती गरिबीची व कोरोनामुळे रुग्णवाहिका मिळत नसल्याने मुलाच्या वडिलांनी समाजसेवकांशी संपर्क साधला. या वेळी पेणमधील समाजसेवक राजू पिचिका यांना सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी मुलास मोफत रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाच्या खर्चाची आर्थिक मदत देऊन मुंबईला उपचारासाठी पाठविले. कोरोनामुळे कोणत्याही प्रायव्हेट व सरकारी हॉस्पिटलने न घेतल्यामुळे अथर्वला एमजीएम रुग्णालय पनवेल येथून पुढील उपचारासाठी सायन हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले. सध्या अथर्ववर सायन हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply