Breaking News

कृषी खाते झोपले आहे का? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

अमरावती ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांसंदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकांवर रोग येत आहेत. या भयंकर परिस्थितीत राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यातील  सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला. सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. या वेळी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोगस बियाणे कंपन्या व सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला.शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर तातडीने मदत दिली जाईल. यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. जे पेरले ते उगवले नाही व हाती आलेली पिके मेलेली होती. त्यामुळे राज्य सरकारमधील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. सरकारच्या महाबीज कंपनीने दोन-तीन हजारांत बाजारातीलच निकृष्ट बियाणे घेऊन शेतकर्‍यांना आठ हजारांना विकले असावे, असा आरोपच कडू यांनी केला.

कृषिमंत्र्यांचा खुलासा

कृषी विभाग शेतकर्‍यांप्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी समोर येतात त्याचा निपटारा करण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सूचनांवर विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले, परंतु राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच दोन मंत्री आमने-सामने आल्याचे पाहावयास मिळाले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply