Breaking News

ऐन सणासुदीत माथेरानमध्ये पाणीटंचाई; पावसाळ्यातही नागरिक तहानलेले

कर्जत ः बातमीदार

रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गणेश चतुर्थीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरानकरांना पाणीपुरवठा केला नसल्याने ऐन सणासुदीत माथेरानकर तहानलेले राहिल्याने माथेरानमधील अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोविडच्या भयंकर संकटात गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माथेरानकरांनी घेतला, पण सण साजरा करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरात सजावट करून बाप्पाच्या आगमनाची तयारी करीत असतानाच माथेरानकरांची चतुर्थीची सकाळ पाण्याशिवाय गेली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत येथे पाणीपुरवठा केला गेला नाही. त्यामुळे सर्व माथेरानकरांच्या आनंदावर विरजन पडले. याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिकांनी कार्यालय गाठले असता कार्यालयात कोणीही अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे माथेरानकरांच्या संतापाचा पारा अधिकच चढला. काही नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येथील स्थानिक समाजसेविका आशाताई कदम यांनी सांगितले की, माथेरानकरांच्या साधेपणाचा अंत पाहू नका. हॉटेल सुरू असतील तेव्हा सुरळीत पाणीपुरवठा होतो, मात्र हॉटेल बंद झाल्यावर अधिकार्‍यांना माथेरान दिसत नाही. शारलोट लेक आणि नेरळ कुंभे या दोन ठिकाणी एकाच वेळेस महिन्यातून दोन दोन वेळा पाणी का सोडले जात नाही. असेच सुरू राहिले तर माथेरानकरांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिला. दरम्यान, याबाबत येथील शाखा अभियंता प्रवीण बिर्ला यांना विचारले असता शारलोट लेक आणि नेरळ जुमापट्टी येथे तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply