पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या साथरोगात 108 रुग्णवाहिकेचे महत्त्व व उपयुक्तता खर्या अर्थाने जाणवू लागली आहे. सुधागड तालुक्यात 108 रुग्णवाहिका बंद असल्याने व ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालीतील एका 57 वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला होता. अखेर आता ही बंद रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे.
रुग्णवाहिका बंद असल्याने आरोग्य प्रशासनासमोरदेखील अनेक अडचणी उभ्या राहत होत्या. शिवाय एखाद्या रुग्णाला अधिक व तातडीच्या उपचारासाठी इतरत्र दवाखान्यात कसे न्यावे, हा प्रश्न सतावत होता. सध्या ही 108 रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
मागील 15 दिवसांपासून इंजीनमध्ये बिघाड झाल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे. तेव्हापासून ही रुग्णवाहिका पाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उभी होती. आता लवकरच ही रुग्णवाहिका दुरुस्त होऊन लोकांना रुग्णवाहिकेअभावी प्राण गमवावा लागणार नाही, अशी अपेक्षा पाली ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.