कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सध्या नवी मुंबईच्या युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी पक्षातील कमिटीच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याने युवक काँग्रेस पक्षामध्ये होणारी खदखद चर्चेचा विषय बनत आहे. एकंदरीतच नवी मुंबई युवक काँग्रेस पक्षामध्ये आपापसातच धुसफूस होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे.
युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुबीन थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुबीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हते. त्यांची नियुक्ती करताना पक्षाने आपणालाही विश्वासात घेतले नसल्याची खंत काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी व्यक्त केली आहे.
युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी 27 डिसेंबर 2019 रोजी मुलाखती झाल्या. विशेष म्हणजे युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून मुलाखतीसाठी येणार्या संभाव्य उमेदवारांमध्ये विजय पाटील, पंकज जगताप, शार्दूल कौशिक, अनिकेत म्हात्रे व रवी जाधव यांच्या नावांचा समावेश होता. युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकार्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे चौघांपैकी एकाची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागेल, असे आडाखे बांधले जात होते, परंतु 2 सप्टेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीने सुबीन थॉमस यांच्या नावाची घोषणा करून सर्व इच्छुक व त्यांचा समर्थकांना धक्का दिला.
सुबीन थॉमस नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये सक्रिय नाहीत, शिवाय पक्षाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. असे असतानाही त्यांची थेट युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची ही कृती संशय निर्माण करणारी असल्याचा आरोप नवी मुंबईतील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सुबीन यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संतापाचे जनक ठरले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी तांबे यांना लक्ष्य केले आहे.
नवी मुंबई काँग्रेस पक्षाची अगोदरच वाताहत झाली आहे. गटबाजीमुळे पक्षात फूट पडली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, परंतु नवी मुंबईत काँग्रेसची झालेली वाताहत पाहता आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीकडून काँग्रेसला फारशा जागा सोडल्या जाण्याची शक्यता कमीच आहे. ही वस्तुस्थिती असतानाही प्रदेश युवक काँग्रेस कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षपदाचा घोळ घालून ठेवल्याची टीका नवी मुंबईतील युवक कार्यकर्त्यांनी केली.
जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार असलेले पंकज दिलीप जगताप यांनी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची करण्यात आलेली निवड अयोग्य आहे. त्याचे दुरगामी परिणाम पक्ष संघटनेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवड अवैध ठरवावी, अशी मागणी पंकज जगताप यांनी केली आहे.
मुलाखत घेऊनही डावलले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांचा पुतण्या पंकज जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा पुत्र शार्दुल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा पुत्र अनिकेत म्हात्रे, तुर्भे गावातील युवा कार्यकर्ते विजय पाटील व बेलापूरचे रवी जाधव हे नवी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद शर्यतीत होते. ते पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला उपस्थित होते. तर नुतन अध्यक्ष सुबीन थॉमस यांचा पक्षातील सहभाग नगण्य आहे. त्यांनी मुलाखतही दिली नव्हती.