Breaking News

अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र

पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून बॅचलर ऑफ टेलिकम्युनिकेशनचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागली, मात्र मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे मोठ्या पगाराची नोकरी सोडून पीयूष गावाकडे परतला. गावात राहूनच व्यवसायाचा निर्णय त्याने घेतला. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात प्रत्येक घरासमोर  लहान तळे असते. या तळ्यातून माश्यांची पैदास केली जाते. हाच मासेविक्रीचा व्यवसाय करण्याचे त्याने ठरवले. अलिबागजवळील पिंपळभाट येथे जिवंत मासेविक्री केंद्र त्याने सुरू केले, परंतु त्याला आधुनिकतेची जोड दिली आणि अलिबाग तालुक्यात पहिले जिवंत माश्यांचे विक्री केंद्र सुरू केले.
पीयूषने पिंपळभाट येथे 20 हजार लिटरच्या साठवण टाक्या उभारल्या. त्यात गावातील मासे सोडले. मासे मोठे झाल्यावर 200 लिटरच्या काचेच्या टाकीमध्ये निरनिराळ्या प्रजातींचे मासे विक्रीसाठी ठेवले. ग्राहकांना विकण्यासाठी काचेच्या पाण्याच्या टँकमध्ये ते ठेवले. त्यामुळे ग्राहकाला हवा असलेला जिवंत मासा टँकमधून काढून तो कापून दिला जातो. त्यामुळे मासे खवय्यांना तळ्यातील जिवंत ताजे मासे मिळू लागले आहेत.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply