सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीची दखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने बुधवार (दि. 15)पासून पनवेल शहरातील नालेसफाई करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिकेने दक्षता घेत तयारी सुरू केली आहे.
पनवेल महापालिकेतील पूर्वीच्या नगर परिषद क्षेत्रात अरूंद रस्त्यांवर अरूंद गटारे आहेत. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पनवेल शहरात पाणी शिरल्याने अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. कधी नव्हे ते महापालिका मुख्यालयाच्या अगदी दारापर्यंत पाणी आले होते. मोसमात तब्बल तीन ते चार वेळा असा प्रकार घडला होता. त्यामुळे यंदा पनवेल शहरातील नालेसफाई आणि पूर नियंत्रणाच्या उपाययोजना राबवण्याची मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. महापालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारपासून पनवेल शहरातील प्रभाग 19 आणि 20मध्ये नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पनवेल शहरात दरवर्षीप्रमाणे सफाई कामगारांकडून नालेसफाई केली जाते. यंदा लॉकडाऊनमुळे रस्त्यावर सकाळी गर्दी नसल्याने सफाई कामगारांना हे काम सोपे जात असल्याचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील झाडलोटीचे प्रमाण फारसे नसल्याने सफाई कामगारांकडून नालेसफाईचे काम केले जात आहे. कोरोनाची साथ लवकर आटोक्यात आल्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा साफसफाई करण्यात येईल, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट प्रशासनाकडून योग्य पद्धतीने हाताळले जात आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर पनवेल शहराला पुन्हा पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये, म्हणून आयुक्तांकडे पावसाळ्यापूर्वीच्या कामांबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. सिडको वसाहतींमध्येही टप्प्याटप्प्याने या कामाला सुरुवात केली जाईल.
-परेश ठाकूर, सभागृह नेते,
पनवेल महानगरपालिका