अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, मुरूड तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी टँकर्स पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 12 गावे व 79 वाड्यांची तहान भागणार आहे.
पेण तालुक्यातील वढाव, लाखोले, कान्होबा, मोठे भाल, विठ्ठलवाडी, शिक्री, ओढांगी, मसद बुद्रूक, मसद खूर्द, बोर्वे, बोर्झे या 11 गावांत, तसेच 62 वाड्या यांना टँकर्स अधिग्रहित करून पाणी देण्यात येईल. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील 17 वाड्यांना व मुरूड तालुक्यातील एका गावाला टँकर्सद्वारे पाणी देण्यात येणार आहे. या वर्षी रायगड जिल्ह्यात 540 गावे आणि 1 हजार 493 वाड्या संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी 9 कोटी 40 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे अलिबाग तालुक्यात 104, उरणमध्ये 8, पनवेलमध्ये 69, कर्जत 141, पोलादपूर 70, पेण 355, सुधागड 81, रोहा 57, माणगाव 117, महाड 522, पोलादपूर 204, म्हसळा 31, श्रीवर्धन 127, मुरूड 77 तळा तालुक्यातील 77 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर्स किंवा बैलगाडीने करण्याबाबत समितीची पुनरर्चना करण्याचे निवडणुक आचारसंहितेमुळे ठरले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची एक समिती नेमण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालावरून या गावांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.