अलिबाग ः प्रतिनिधी
वयाच्या तिसर्या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सुमारे 5141 फुटांवर असलेला साल्हेर किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शर्विका म्हात्रे या तीन वर्षांच्या चिमुरडीने सर केला आहे.
10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता शर्विकाने किल्ला आरोहणाला सुरुवात केली. सुमारे साडेपाच तासांच्या चढाईनंतर शर्विकाने महाराष्ट्राच्या सर्वांत उंच किल्ल्यावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकविला. विशेष म्हणजे हा विक्रम शर्विकाच्या पालकांनी देशातील तमाम कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व डॉक्टर्स, नर्स, पत्रकार, पोलीस, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते आपापले योगदान देत आहेत.अनेकांना हे कार्य करताना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साल्हेर किल्ल्यावरील श्री परशुराम मंदिर या सर्वाधिक उंचीवरून फलक झळकावून शर्विकाने कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला सर करणारी शर्विका महाराष्ट्रातील सर्वांत लहान कन्या ठरली आहे. तिच्या या पराक्रमाची नोंद सलग दुसर्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Check Also
नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष
नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …
RamPrahar – The Panvel Daily Paper