कर्जत ः बातमीदार
ओबीसीमधील सर्व 3142 जातींना दिलेले आरक्षण घटनेने मान्य केल्याने त्या आरक्षणाला धक्का लागू नये, असा ठराव नेरळ येथे झालेल्या ओबीसी परिषदेत घेण्यात आला. त्याच वेळी 2021मध्ये होणारी जनगणना ही जातीनिहाय करावी यासाठी कर्जत तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजप्रमुखांनी एकमत दर्शविले आहे. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात ओबीसी प्रवर्गातील जातींच्या समाजप्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली होती. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या परिषदेत ज्येष्ठ विचारवंत वसंत कोळंबे यांच्यासह आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, भटक्या विमुक्त जातीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भगवान चव्हाण, गुरव समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गुरव, धनगर समाजाचे जिल्हा अध्यक्ष रामदास कोकरे, लोहार समाजाचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन जोशी, नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे, साळी समाजाचे जिल्हा पदाधिकारी एस. व्ही. हावरे, तसेच आगरी समाजाचे सचिव शिवराम तुपे, भगवान धुळे, रवींद्र सोनावळे, एन. डी. म्हात्रे, सुरेश गोमारे, संतोष ऐनकर, मनोज पाटील, देविवास कोळंबे, रुचिता लोंगले आदी उपस्थित होते. सुरुवातीला आयोजक सावळाराम जाधव यांनी ओबीसी परिषद घेण्याची मूळ संकल्पना स्पष्ट केली.