Breaking News

एसटी कर्मचार्‍यांचे 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन

पेण : प्रतिनिधी

कोरोना महामारीत अनेक एसटी कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता कामावर येऊन प्रवासी वाहतूक सुरळीतपणे हाताळली, मात्र त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. या एसटी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता, दिवाळी उचल, दिवाळी भेट आणि थकीत वेतन येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही, तर 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी आपापल्या घरासमोर आक्रोश आंदोलन करतील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचेे विभागीय अध्यक्ष विलास खोपडे यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे यांनी आक्रोश आंदोलनाबाबतचे निवेदन राज्य सरकारला दिले असून, त्यांच्या  आदेशानुसार 2 नोव्हेंबरला संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत कर्मचार्‍यांना वेतन, महागाई भत्ता, दिवाळी उचल तसेच दिवाळी बोनस न दिल्यास एसटी कर्मचारी आपल्या घरामध्ये अथवा घरासमोर कुटुंबासह ‘पगार दो‘ असा आक्रोश करणार आहेत, असे खोपडे यांनी सांगितले. पेण येथे मंगळवारी (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे विभागीय सचिव गणेश शेलार, केंद्रीय उपाध्यक्ष आशा घोलप, संघटक सचिव तुळशीदास पाटील, कोषाध्यक्ष चंद्रशेखर देव, प्रसिद्धी सचिव बाळू बांगर, सदस्य कमलाकर कांबळे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply