पाली : प्रतिनिधी
अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सम्यक क्रांती विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 27) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले. आठवडाभर कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातपीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे सुधागडातील शेतकर्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यांना शासन मदतीची अपेक्षा आहे. या संकटाच्या काळात बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी सीताराम पवार, रमेश जाधव, लक्ष्मण वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.