सर्वपक्षीय संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी
मुंबई : रामप्रहर वृत्त
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी (दि. 30) सिडको प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नये, अशी मागणी समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केली.
सिडकोच्या मुंबईतील निर्मल भवनमध्ये झालेल्या या बैठकीला सिडको अध्यक्ष आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, बाळाराम पाटील, तसेच बबन पाटील, शिरीष घरत, महेंद्र घरत, जे. एम. म्हात्रे, अतुल पाटील, मेघनाथ तांडेल, सुरेश पाटील, रवी पाटील, काशिनाथ पाटील, केसरीनाथ पाटील, प्रल्हाद केणी, प्रभाकर जोशी, सुरदास गोवारी, सुधाकर पाटील, संतोष पवार आदी समितीचे सर्वपक्षीय पदाधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या चर्चेत प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे सिडकोने तोडू नये, ती नियमित करण्यात यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. आमची बाजू शासनाकडे, तसेच न्यायालयात मांडा, असेही संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले. सिडको एमडी चंद्रा यांनी समितीचे म्हणणे मान्य केले.
दरम्यान, सिडकोसोबत झालेल्या चर्चेसंदर्भात संघर्ष समितीची आढावा बैठक 15 दिवसांनी होणार आहे.