आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजा पाचनंद येथे प्रचार सभा


पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली आहे. ती जनतेला वाचून दाखवा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यात आल्या. रविवारी (दि. 31) तळोजे मजकूर येथे प्रचाराची पहिली सभा झाली. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या वेळी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
पनवेलमधून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व संपले आहे. महायुतीची ताकद वाढत आहे. त्यामुळे पनवेलमधून महायुतीच्या उमेदवाराला एक लाख मतांची आघाडी मिळणार आहे, असे बबनदादा पाटील म्हणाले. पनवेलमध्ये खासदार श्रीरंग बारणे हे ’अर्जुन’ आहेत आणि त्यांचे सारथ्य करणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ’श्रीकृष्ण’ आहेत. हे दोघे मिळून पनवेलच्या विकासाचा रथ पुढे नेणार आहेत. त्यामुळे विकासपुरुषाला मत देऊन महायुतीला विजय मिळवून देण्याचे आवाहन युतीचे नेते अरुण बागल यांनी केले.
खासदार म्हणून काम करीत असताना सर्वसामान्यांशी नाते जोडण्याचे काम केले आहे. मराठी माणूस दिल्लीत बोलत नाही. मराठी माणसाचा दिल्लीच्या दरबारी आवाज नाही असे आजपर्यंत बोलले जायचे, पण याला छेद देत पाच वर्षांच्या कालावधीत 1 हजार 110 प्रश्न उपस्थित केले. 289 वेळा देशाच्या संसदेत बोलून 20 टक्के खासगी विधेयके मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सामर्थ्यशाली बनला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य आहे. चांगल्या उमेदवाराला मतदारांनी बळ द्यावे.
-श्रीरंग बारणे, खासदार
खासदार श्रीरंग बारणे हेच या वेळीदेखील विजयी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम सरकार देशात काम करीत आहे. मागील पाच वर्षांत संपूर्ण जगभरात भारताचा गौरव झाला आहे. एक जागरूक खासदार कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार बारणे आहेत. देशाची घडी आणखी सुस्थितीत बसविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागून खासदार बारणे यांना विजयी करावे.
-प्रशांत ठाकूर, आमदार