कर्जत : प्रतिनिधी : मुंबई-पुणे दरम्यानच्या कर्जत रेल्वेस्थानकातील इंडिकेटरची अवस्था फारच बिकट झाली आहे. हे सगळेच डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी केली आहे.
प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेस्थानकातील इंडिकेटर ही फार महत्त्वाची असतात. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रत्येक प्रवासी इंडिकेटर बघून आपला निर्णय घेत असतो, मात्र कर्जत रेल्वेस्थानकातील सर्व इंडिकेटर्स खराब असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या स्थानकातील पुणे बाजूकडील पुलावर असलेले इंडिकेटर नेहमीच नादुरुस्त असतात, तसेच फलाट क्रमांक तीनवर असलेले डिजिटल घड्याळसुद्धा नादुरुस्त झाले आहे. त्यावर 8888 असेच दिसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना गाडी पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. अशा वेळी एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील इंडिकेटर्स नादुरुस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा बरेच वेळेला कर्जत रेल्वेस्थानकात इंडिकेटर्स नादुरुस्त झाले होते व या बाबतीत पंकज ओसवाल यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून, या इंडिकेटर्सची दुरुस्ती करून घेतली आहे, मात्र सतत तीच परिस्थितीत निर्माण होत असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील सगळेच डिजिटल इंडिकेटर्स बदलण्यात यावे, अशी मागणी पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
अलीकडच्या काळात अनेक रेल्वेस्थानकात नवीन सफेद रंगाचे इंडिकेटर्स बसविण्यात येत आहेत, तसेच इंडिकेटर्स कर्जत रेल्वेस्थानकात बसविण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे व तशीच मागणी पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
बदलापूर रेल्वेस्थानकात सफेद रंगाचे नवीन डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत, तसेच इंडिकेटर्स कर्जत रेल्वेस्थानकात बसविण्यात यावेत, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
-पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत