31 डिसेंबरपर्यंत नियम लागू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाइन्स) जारी करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान, याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. तेथे स्थानिक प्रशासन, पोलिसांवर नियमांची योग्य अमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सक्ती केली जावी. याशिवाय ज्या शहरांमध्ये आठवड्यातील पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांच्या वर आहे तिथे कार्यालयीन वेळांबद्दल योजना तसेच इतर उपाययोजनांबद्दल विचार करावा जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश परिस्थितीचा आढावा घेत कोरोनालो रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू)सारखे निर्बंध लावू शकतात, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले, मात्र केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय कंटेन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावला जाऊ नये, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.