मुरूडमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली
मुरूड ः प्रतिनिधी – निवार चक्रीवादळ शुक्रवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास 25 किमी प्रतितास वेगाने मुरूड तालुक्यात धडकल्याने नागरिक भयभयीत झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता होती. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे सागरीकिनारी वसलेल्या मुरूडमध्ये शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातवरण होते. दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. या ढगाळ वातावरणाचा परिणाम पर्यटकांवर झाल्याचे दिसून आले. शनिवार असूनही येथे पर्यटक फिरकलेच नाहीत. अल्प प्रमाणातच पर्यटक समुद्रकिनारी दिसले.
शनिवार-रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने काशिद व मुरूड समुद्रकिनारी येत असतात, परंतु निवार चक्रीवादळामुळे संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने पर्यटकांनी येथे न फिरकणेच पसंत केले. खोल समुद्रात मासेमारी करणार्या बोटीसुद्धा किनार्याला लागलेल्या आढळून आल्या. मुरूड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र हे नारळ-सुपारी बागायत जमिनीचे आहे. नुकताच जोरदार वारा वाहिल्याने नारळ-सुपारीची झाडे प्रचंड वेगाने हलत होती. सुदैवाने अद्याप कोणतीही दुर्घटना घडली नाही.
3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळानंतर पुन्हा अशीच परस्थिती उद्भवल्याने येथील नागरिक चिंतेत सापडले आहेत. अशा ढगाळ वातावरणामुळे लोकांनी प्रवास करणेसुद्धा टाळले आहे. त्यामुळे कोणत्याही बसस्थानकावर गर्दी दिसून आली नाही.