ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या वन डेत विजय
कॅनबेरा : कर्णधार विराट कोहलीसह अष्टपैलू हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांची अर्धशतके आणि शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. अंतिम सामन्यात 13 धावांनी विजय साकारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करीत चांगली झुंज दिली, परंतु मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले.
303 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती मिळालेला लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर शार्दुल ठाकूरने स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत ‘कांगारूं’ची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात दोघांना यश येतंय असे दिसत असतानाच विराटने पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरकडे चेंडू दिला. शार्दुलनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता हेन्रिकेजला माघारी धाडत टीम इंडियाला महत्वाचा बळी मिळवून दिला.जडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये भर टाकली. ग्लेन मॅक्सवेलने नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मैदानात चौफर फटकेबाजी केली. बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला.