Breaking News

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने : राम शिंदे

पुणे ः प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनाने (ईडी) धाडसत्र आणि चौकशी सुरू केल्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आघाडी सरकारवर पुण्यात हल्लाबोल केला.
राम शिंदे म्हणाले की, तत्कालीन राज्य सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियान सर्वांत यशस्वी सर्वात ठरले होते. या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांना फायदा झाला, पण आता सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने या अभियानाची चौकशी महाविकास आघाडी सरकार करीत आहे. त्या वेळी निर्णय घेताना आमच्यासोबत शिवसेना होती. तेव्हा त्यांनी कोणत्याही निर्णयाला विरोध केला नाही. त्यामुळे आता शिवसेनेची संशयास्पद भूमिका असल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी पुढे बोलताना आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
राज्यात विकासकामे ठप्प
या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर शिंदे यांनी टीका केली. राज्यातील जनतेला जी आश्वासने दिली होती ती सरकारकडून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. वर्षभरात भरपूर विकास करून दाखवतो असे सांगण्यात आले होते. विविध आमिषे दाखवण्यात आली होती, पण वर्षभराच्या कालखंडात कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सध्या डोनाल्ड ट्रम्प काय करतात? बायडन काय करतायत? बिहारच्या निवडणुकीमध्ये काय चालले आहे? याकडेच ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत स्वत:च्या मतदारसंघात विकासाची कामे करायची राहून जातात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply