कर्जत : बातमीदार
येथील रेल्वेस्टेशन परिसरातील नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.नेरळ रेल्वेस्टेशनच्या माथेरान लोकोशेडमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांना परिसरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मानवी शरीराचे अवयव दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता माथेरान लोकोशेड व राज बाग सोसायटीला लागून असलेल्या नाल्यात दोन सुटकेस फुगलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्या बाहेर काढल्यानंतर सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे केलेले अवयव आढळले, मात्र शरीराचा काही भाग व डोके सापडले नाही. हे वृत्त समजताच कर्जतचे उपअधीक्षक अनिल घेर्डीकर आणि नेरळ पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केले होते. आढळलेला मृतदेह 40 वर्षे वयोगटातील पुरुषाचा असून या व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी मारून टाकण्यात आले असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना हत्यारे भरलेली प्लास्टिक पिशवी सापडली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.