कर्जत : बातमीदार
कोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे कर्जत तालुक्यातील एसटी सेवा मागील काही महिन्यांपासून बंद होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने एसटीच्या कर्जत आगाराने तालुक्यातील नेरळ-कळंब विभागात आज (दि. 17)पासून वेळापत्रकानुसार बससेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, मात्र ग्रामीण भागातील एसटी बससेवा बंद असल्याने विद्यार्थी तसेच प्रवाशांना अधिकचे प्रवास भाडे द्यावे लागत होते. खाजगी प्रवासी वाहक प्रवाशांची लूट करीत होते. ते परवडत नसल्याने कळंब परिसरामधील विद्यार्थ्यांनी तसेच पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकार्यांनी कळंब-वारे ते नेरळ एसटी बससेवा पूर्ववत करण्याची मागणी कर्जत आगार प्रमुखांकडे केली होती. याची तात्काळ दखल घेत आगार प्रमुखांनी 17 डिसेंबरपासून नेरळ-कळंब विभागात वेळापत्रकानुसार बससेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारपासून या मार्गावरील बससेवा वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली आहे. कर्जत आगारकडून 17 डिसेंबरपासून वेळापत्रकानुसार बससेवा सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मासिक पासही देण्यात येत आहेत. एसटीच्या सर्व प्रवाशांना मास्क तथा सॅनिटाइझर वापरणे बंधनकारक आणि सामजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. -शंकर यादव, आगार प्रमुख, कर्जत