Breaking News

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल; घोषणापत्र नव्हे ‘ढकोसलापत्र’

इटानगर ः वृत्तसंस्था

सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देणार्‍या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. देशातील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणार्‍या, ‘जय हिंद’ऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्‍यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा वाटतो, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

ते अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका जनसभेत बोलत होते.

काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेतील देशद्रोहाचे कलम (124-अ) रद्द करण्याचे वचन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडतो, मात्र काँग्रेसला हे कलमच रद्द करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात नेमका कोणासोबत आहे, देशासोबत की देशद्रोह्यांसोबत, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. आम्ही गॅस देण्याचे आश्वासन दिले नव्हते, मात्र उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 7 कोटींहून अधिक सिलिंडर दिले. आम्ही आरोग्य क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या नव्हत्या, मात्र आयुष्यमान भारत योजना लागू केली. त्यातून गरिबांना मोफत उपचार मिळत आहेत. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण करतोच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी काँग्रेस देशाबरोबर आहे की देशद्रोहींबरोबर आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेसने देशाबद्दल अपशब्द वापरणार्‍यांसाठी एक योजना बनवली आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ ही घोषणा देणारे, तिरंगा जाळणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणार्‍यांबाबत काँग्रेसला सहानुभूती आहे. भारताचे संविधान न माननार्‍यांनाही वाचवण्याचे घातक आश्वासन काँग्रेसने दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा ढोंगीपणाचा मुखवटा या वेळी टराटरा फाडला. काँग्रेसचे घोषणापत्र हे ‘ढकोसलापत्र’ असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी केली. एकीकडे आमचे निश्चयी सरकार आहे, तर दुसरीकडे खोटी आश्वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात सर्व फसवी आश्वासने आहेत. त्याला जाहीरनामा नव्हे, तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक आहे. आम्ही 18000 गावे आणि 3 कोटी कुटुंबांपर्यंत वीज पोहचवली. काँग्रेसने हे आश्वासन 2004मध्ये दिले होते, पण 2014पर्यंतही ते आश्वासन पूर्ण झाले नाही, मात्र जेव्हा आम्ही 2014मध्ये सत्तेत आलो तेव्हा देशातील 18000 गावे आणि 3 कोटी लोक अंधारात जगत होते. आम्ही या सर्वांपर्यंत वीज पोहचवली, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply